‘स्वाधार’अंतर्गत अर्जासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 01:27 PM2018-02-03T13:27:44+5:302018-02-03T13:30:11+5:30
नाशिक : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना २०१७-१८ करिता अर्ज करण्याची मुदत २८ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. यापूर्वी स्वाधार योजनेंतर्गत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची मुदत १५ नोव्हेंबर २०१७ पर्यंत देण्यात आलेली होती. ही मुदत वाढवून ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत वाढविण्यात आली होती. ही मुदत पुन्हा वाढविण्यात आली असून, आता २८ फेबुवारीपर्यंत विद्यार्थ्यांना स्वाधारअंतर्गत अर्ज करता येणार आहेत. समाजिक न्याय विभागातर्फे राबविण्यात येणाºया स्वाधार योजनेसाठी निश्चित कालावधीत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना अर्ज भरता न आल्याने या योजनेचे अर्ज भरण्यास शासनाकडून मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु, सुधारित सूचनांनुसार विद्यार्थ्यांना दिलेल्या ३१ डिसेंबरपर्यंतच्या मुदतवाढीनंतरही अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज केले नसल्याने पुन्हा एकदा स्वाधारअंतर्गत अर्ज करण्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शासनाच्या १६ नोव्हेंबर २०१७ च्या शुद्धिपत्रकानुसार या योजनेच्या अटी-शर्तीत बदल करण्यात आला असून, योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना किमान ५० टक्के गुण असणे अनिवार्य आहे. शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज केलेल्या व प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांचा या योजनेअंतर्गत निवडीसाठी प्राधान्याने विचार करण्यात येईल. महानगरपालिका, नगरपालिका, एमएमआरडीए, एमआरडीए, एनआयटी यांसारख्या प्राधिकरणाच्या हद्दीपासून २० किलोमीटर परिसरात असलेल्या महाविद्यालयांत शिकत असलेले अनुसूचित जातीचे विद्यार्थी या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र ठरणार आहेत.