दहावी, बारावीचे क्रीडा गुण प्रस्ताव सादर करण्यास २५ जूनपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 04:38 PM2021-06-12T16:38:25+5:302021-06-12T16:47:43+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२०-२१ वर्षात परीक्षेसाठी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीच्या गुणांसाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी २१ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२०-२१ वर्षात परीक्षेसाठी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीच्या गुणांसाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी २१ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
दहावी व बारावीच्या परीक्षा कोरोनाच्या संकटामुळे रद्द करण्यात आल्या असल्या तरी या विद्यार्थ्यांचे निकाल अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे तयार करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहे. त्यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांना आठवी व नववीत क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेण्याच्या सूचना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने केल्या आहेत. तसेच बारावीच्या परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांच्या बाबतीत बारावी आणि अकरावीत असताना क्रीडा स्पर्धांमधील सहभाग विचारात घेऊन विद्यार्थ्यांना २०२०-२१ वर्षासाठी गुण देण्यात यावेत, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी असे गुण मिळण्याबाबतचे प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी यांना १२ ते २१ जूनपर्यंत सादर करावे लागणार असून, संबंधित जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागीय मंडळाकडे २५ जूनपर्यंत या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव व यादी सादर करण्याच्या सूचना राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केल्याची माहिती नाशिक विभागीय कार्यालयाने दिली आहे.