टंचाईग्रस्त विद्यार्थ्यांची माहिती देण्यास २५ मार्चपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:15 AM2021-03-16T04:15:44+5:302021-03-16T04:15:44+5:30
नाशिक : राज्यातील २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या तीन शैक्षणिक वर्षांत दुष्काळग्रस्त, टंचाईग्रस्त, अथवा अवकाळी पावसामुळे बाधित क्षेत्रातील दहावी ...
नाशिक : राज्यातील २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या तीन शैक्षणिक वर्षांत दुष्काळग्रस्त, टंचाईग्रस्त, अथवा अवकाळी पावसामुळे बाधित क्षेत्रातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून ऑनलाईन पद्धतीने आधार संलग्न बँक खात्याची माहिती मागविण्यात आली होती. मात्र नवीन प्रणालीनुसार अनेक शाळांना ही माहिती निर्धारित वेळेत संकेसस्थळावर अपलोड करण्यात अडचणी आल्याने ही माहिती देण्यासाठी २५ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
शैक्षणिक वर्ष २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या कालावधीत परीक्षा शुल्कमाफीस पात्र तथा अद्याप परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती झालेली नाही अशा विद्यार्थ्यांनी स्वत:च्या अथवा पालकांच्या आधार संलग्न बँक खात्याच्या माहितीसह संबंधित माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांशी संपर्क साधण्याचे आवाहन राज्य मंडळाने केले आहे. शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये अवेळी पावसामुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या कार्यवाहीसाठी संबंधित यंत्रणांनाही राज्य मंडळांने सूचित केले असून याविषयीची सविस्तर माहिती मंडळाच्या ‘फी रिफंड’ संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. शाळांनी व कनिष्ठ महाविद्यालयांनी ही माहिती विद्यार्थीनिहाय भरून संकेतस्थळावर सबमिट केल्यानंतर यादीच्या शेवटी देण्यात आलेले प्रमाणपत्र मुख्याध्यापक, प्राचार्य यांना स्वाक्षरीसह प्रमाणित करून अपलोड करावे लागणार आहे. त्यानुसार बँक खात्याचा तपशील प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती सोमवारपर्यंत (दि. १५) ऑनलाईन पद्धतीने राज्य मंडळास सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र, या निर्धारीत वेळेत माहिती अपलोड करण्यात अडचणी आल्याच्या तक्रारी अनेक शाळांकडून प्राप्त झाल्याने शिक्षण मंडळाने माहिती सादर करण्यास मुदतवाढ दिली असून वाढीव मूदतीत संबधित सर्व शाळांनी ही माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्याच्या सूचना राज्य शिक्षण मंडळाचे सचिव अशोक भोसले यांनी सर्व विभागीय मंडळांना केल्या आहेत.