स्मार्ट रोडच्या कामासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 01:10 AM2019-05-14T01:10:55+5:302019-05-14T01:11:53+5:30
त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ या अवघ्या एक किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीने आता ३० जूनपर्यंत मुदत दिली असून, आता तरी हे काम सुरू होईल काय याविषयी शंकाच व्यक्त केली जात आहे.
नाशिक : त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ या अवघ्या एक किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीने आता ३० जूनपर्यंत मुदत दिली असून, आता तरी हे काम सुरू होईल काय याविषयी शंकाच व्यक्त केली जात आहे. या रस्त्याच्या कामासाठी सीबीएस चौकात काम करण्यासाठी याठिकाणची वाहतूक बंद करण्याची अधिसूचना पोलिसांनी जाहीर करून १५ दिवस झाले, मात्र याठिकाणी कोणत्याही प्रकारचे काम करण्यात आलेले नाही.
एक किलोमीटरच्या या रस्त्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. मेहेर ते सीबीएस हेच काम इतके प्रचंड रखडले की, या मार्गावरून जाणे-येणे लोकांना त्रासदायक होऊ लागले. असाच प्रकार सीबीएस ते त्र्यंबक नाका सिग्नलदरम्यान घडला.
जानेवारी २०१८ मध्ये या ठेकेदाराला कार्यारंभ आदेश दिल्यानंतर सहा महिन्यांत रस्त्याचे काम पूर्ण होणे बंधनकारक होते. परंतु या कालावधीत ते पूर्ण झालेले नाही. त्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र या मुदतीतही हे काम पूर्ण झाले नाही. दरम्यान, राधाकृष्ण गमे यांनी या रस्त्याची पाहणी केल्यानंतर त्यांनी ठेकेदारास ३१ मार्चपर्यंत अल्टिमेटम दिला होता. परंतु आता तोदेखील संपुष्टात आल्यानंतर आता ३० जून ही नवीन डेडलाइन दिली आहे. रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारास आता एकूण निविदा रकमेच्या अर्धा टक्का दंड करण्याचा प्रस्ताव आहे.
रस्त्याचे त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ असे काम करण्यात येत असून, त्यासाठी सर्वाधिक रहदारीची सीबीएस चौकातील वाहतूक बंद करण्याची सूचना २५ एप्रिल रोजी काढण्यात आली. मात्र पंधरा दिवस झाले तरी या चौकात कोणत्याही प्रकारचे काम सुरू नाही आणि वाहतूकदेखील सुरू आहे.