रबडी, बासुंदीत झुरळ टाकून नाशिकमध्ये मिठाई व्यावसायिकांकडून उकळली एक लाखाची खंडणी
By अझहर शेख | Published: September 14, 2022 08:27 PM2022-09-14T20:27:47+5:302022-09-14T20:28:47+5:30
शहरातील दोघा मिठाई व्यावसायिकांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी वसूलीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
नाशिक : शहरातील दोघा मिठाई व्यावसायिकांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी वसूलीचा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि.१४) उघडकीस आला आहे. संशयित खंडणीखोराने दुकानांमधून खाद्यपदार्थ खरेदी करून त्यात स्वत:जवळ बाळगलेले झुरळ टाकून व्हीडिओ बनवून दुकानदारांना खंडणीसाठी धमकावल्याचे व्यावसायिकांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
विद्याविकास सर्कलजवळील स्वीट्स व सावरकरनगर येथील मधुर स्वीट्स या दुकानात संशयित अजय राजे ठाकूर याने १९ ऑगस्ट व ७ सप्टेंबर या तारखांना दुकानांत जात खाद्यपदार्थाची खरेदी केली. यावेळी सागर स्वीटस या दुकानातून संशयित अजय याने बासुंदी खरेदी केली. यामध्ये झुरळ टाकून त्याचा व्हिडिओ बनवून फिर्यादी दुकानमालक रतन पुंजाजी चौधरी (४०,रा.लवाटेनगर) यांना धमकावले. त्यांना अन्न-औषध प्रशासनाकडे तक्रार करण्याचा धाक दाखवून दुकानाच्या पाठीमागील कार्यालयात २०ऑगस्ट रोजी १ लाख रुपयांची रोकड खंडणीच्या स्वरुपात घेल्याचे चौधरी यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
यानंतर संशयित अजय हा मागील आठवड्यात सावरकरनगर येथील मधुर स्वीटस नावाच्या दुकानात गेला. तेथेही त्याने रबडी खरेदी करून असाच प्रकार करत दुकानमालक फिर्यादी मनीष मेघराज चौधरी (२३,रा.पाईपलाईनरोड) यास अन्न-औषध प्रशासनाकडे याबाबत तक्रार करण्याची धमकी देत ५० हजारांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला. दुकानाचे व्यवस्थापक पुखराज चौधरी यांना व्हिडिओ पाठवून व्हॉट्सॲप कॉल करून दुकानाची बदनामी करत दुकान बंद करून टाकू अशी धमकी देत ५० हजारांची खंडणीची मागणी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी गंगापुर पोलीस ठाण्यात संशयित अजयविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.