वाढीव प्रवास भाड्यापेक्षा जादा आकारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 12:50 AM2018-06-21T00:50:44+5:302018-06-21T00:50:44+5:30
एसटी महामंडळाने चार दिवसांपूर्वी एसटी बसच्या प्रवासात १८ टक्के भाडेवाढ केली. मात्र महामंडळाच्या मुंबई मध्यवर्ती कार्यालयाकडून आॅनलाइन पद्धतीने बस वाहकाजवळ असलेल्या ‘ईटीआयएम मशीन’मध्ये वाढीव दराची चुकीच्या पद्धतीने नोंद झाल्याने प्रवासी व पासधारकांना त्यामुळे मोठी आर्थिक झळ सोसावी लागत आहे.
नाशिकरोड : एसटी महामंडळाने चार दिवसांपूर्वी एसटी बसच्या प्रवासात १८ टक्के भाडेवाढ केली. मात्र महामंडळाच्या मुंबई मध्यवर्ती कार्यालयाकडून आॅनलाइन पद्धतीने बस वाहकाजवळ असलेल्या ‘ईटीआयएम मशीन’मध्ये वाढीव दराची चुकीच्या पद्धतीने नोंद झाल्याने प्रवासी व पासधारकांना त्यामुळे मोठी आर्थिक झळ सोसावी लागत आहे. महामंडळाचे अधिकारी व कर्मचारीदेखील यामुळे गोंधळून गेले असून, बस वाहकाच्या ईटीआयएम मशीनमध्ये दरवाढीची योग्य नोंद करणे गरजेचे झाले आहे. एसटी महामंडळाकडून बस प्रवासामध्ये १८ टक्के दरवाढीची घोषणा करून १६ जूनपासून भाडेवाढ लागू करण्यात आली. त्यानुसार महामंडळाकडून दरवाढ झालेला सुधारित भाडे तक्ता सर्व अधिकारी, बसडेपो यांना पाठविण्यात आला. मात्र बस वाहकाकडे असणाऱ्या ‘ईटीआयएम मशीन’मध्ये महामंडळाच्या मुंबई मध्यवर्ती कार्यालयाकडून आॅनलाइन झालेल्या दरवाढीच्या आकड्याची नोंद करताना चूक झाल्याने काही किलोमीटरच्या तिकिटाच्या दरात ४० ते ५० टक्के भाडेवाढ झाली आहे. बस स्थानकांतील पास वितरित करणारे अधिकारी, कर्मचारी, बसवाहक प्रत्येकी दोन किलोमीटरच्या स्लॅबला काय तिकीट दर आकारतो त्याप्रमाणेच मासिक पासला रकमेची आकारणी करू लागल्याने अव्वाच्या-सव्वा आकारणी केली जात आहे.
तीन दिवसांपूर्वीच विद्यार्थ्यांना, कामगारांना मासिक पासचे अर्ज वितरित करण्यात आले होते. मंगळवारपासून विद्यार्थ्यांना पास वितरित करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र बस वाहकाजवळील ईटीआयएम मशिनमध्येच चुकीच्या दरवाढीची नोंद झाल्याने व त्यानुसार मासिक पास दर आकारणी होत असल्याने विद्यार्थी व पालकांना मोठी आर्थिक झळ सोसावी लागत आहे. महामंडळाच्या पास वितरित कर्मचा-याच्या सांगण्यानुसार जास्तीत जास्त २२ किलोमीटर अंतरापर्यंतचे विद्यार्थी मासिक पास काढतात. १६ जूनला महामंडळाने पाठविलेला सुधारित भाडे तक्ता व बस वाहकाच्या ईटीआयएम मशीनमध्ये दरवाढ आकड्याची नोंद करताना चूक झाल्याने गोंधळ निर्माण झाला आहे शेजारील चौकटीत ‘स्टार’ केलेली आकड्यांची चुकीची नोंद ईटीआयएम मशीनमध्ये झाल्याने गोंधळ निर्माण झाला आहे.