अतिवृष्टी मोजण्याचा पेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 10:27 PM2019-10-13T22:27:00+5:302019-10-14T00:27:58+5:30
बदलत्या वातावरणामुळे पावसाचा मूळ स्वभावच बदलून गेल्याने ठराविक क्षेत्रात धोधो बरसणाऱ्या अतिवृष्टीने होणाºया नुकसानीचे निकष कसे पडताळून पहावेत, असा पेच जिल्हा प्रशासनालाही पडू लागला आहे. परंपरागत पावसाचे सर्व ठोकताळे लहरी पावसामुळे केव्हाच वाहून गेल्याने पावसामुळे होणाºया नुकसानीचे निकष लावताना प्रशासनाचीही दमछाक होताना दिसत आहे.
नाशिक : बदलत्या वातावरणामुळे पावसाचा मूळ स्वभावच बदलून गेल्याने ठराविक क्षेत्रात धोधो बरसणाऱ्या अतिवृष्टीने होणाºया नुकसानीचे निकष कसे पडताळून पहावेत, असा पेच जिल्हा प्रशासनालाही पडू लागला आहे. परंपरागत पावसाचे सर्व ठोकताळे लहरी पावसामुळे केव्हाच वाहून गेल्याने पावसामुळे होणाºया नुकसानीचे निकष लावताना प्रशासनाचीही दमछाक होताना दिसत आहे.
राज्यात यंदा सर्वत्र पावसाने कहर केला. अगदी मुंबई, पुणे यांसारख्या मेट्रो शहरात आणि दुष्काळी भागातील जिल्ह्यांमध्येदेखील धोधो पाऊस बरसला. हवामान खात्याचे सर्व अंदाज फोल ठरवत राज्यातील सर्व धरणे भरून वाहू लागली आहेत. अगदी परतीच्या पावसानेदेखील धुमाकूळ घातला असून, आॅक्टोबरच्या अखेरच्या चरणातही पावसाने झोडपून काढले आहे. पडणाºया एकूण पावसावर आणि क्षेत्रानुसार नुकसानीचा अंदाज काढला जातो. परंतु पावसाचे एकूणच ताळतंत्र पाहता भरपाईसाठी अतिवृष्टीचा निकष लावण्याचे मापदंडदेखील पडताळून पाहण्याची वेळ आली आहे.
हवामान खात्याच्या मानांकानुसार ६५ मि.मी.च्या पुढे पडणारा पाऊस अतिवृष्टी म्हणून गणला जातो. जिल्ह्यात जुलैमध्ये एकदा, आॅगस्टमध्ये तीनदा, सप्टेंबरमध्येही तीनदा आणि आॅक्टोबरमध्ये दोनदा अतिवृष्टी झाली. यामध्ये शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर अनेकांचे संसार उघड्यावर आले. त्यांना मदत करण्यासाठीचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. काहींना मदतही करण्यात आली आहे. शासकीय नियमाप्रमाणे एकाच दिवशी अथवा ठराविक काळात ६५ मि.मी. पाऊस झाला तर त्याला अतिवृष्टी असले संबोधले जाते किंबहुना अशावेळी नुकसानीचे निकष लागू होतात. खरेतर भौगोलिकदृष्ट्या किती क्षेत्रावर ६५ मि.मी. मीटरच्या पुढे पाऊस झाला याचे मोजमाप करण्याचे तंत्रच कार्यान्वित नाही किंबहुना त्याबाबतची कोणतीही स्पष्टता नाही. जिल्ह्यात सर्कल लेव्हलखाली अतिवृष्टी मोजण्याचे परिमाण नाही. त्यामुळे अतिवृष्टी मोजण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे.
भरपाईचा पेच : पावसाची विषमता
एका सर्कलच्या क्षेत्रात ८ ते १० गावे येतात. परंतु या सर्वच गावांमध्ये पाऊस होतो असे नाही तर एखाद्या गावातच तास-दीडतास धुवाधार पाऊस होतो आणि तेथेच नुकसान होते. त्या एका गावातील पावसाच्या नुकसानीसाठी अतिवृष्टीचा निकष लावणे कठीण होते. संपूर्ण सर्कलचा पाऊस मोजला जातो तेव्हा सरासरी ३० ते ४० मि.मी. इतकाच पाऊस मोजला जातो. अशावेळी भरपाई देणार कशी, असा प्रश्न निर्माण झालेला आहे.