लावणीच्या फडावर तिसऱ्या डोळ्याची नजर
By admin | Published: May 11, 2017 02:37 AM2017-05-11T02:37:01+5:302017-05-11T02:37:11+5:30
नाशिक : महाकवी कालिदास कलामंदिरात ‘लावणी’च्या कार्यक्रमांमध्ये अतिउत्साही प्रेक्षकांना आवर घालण्यासाठी आयोजकांकडून चित्रीकरण केले जात आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महाकवी कालिदास कलामंदिरात ‘लावणी’च्या कार्यक्रमांमध्ये यापूर्वी झालेला गोंधळ लक्षात घेऊन अतिउत्साही प्रेक्षकांना आवर घालण्यासाठी आयोजकांकडून प्रेक्षागृहाचे व्हिडीओ चित्रीकरण केले जात आहे. त्यामुळे यंदाच्या मोसमात बुधवारी (दि. १०) पहिल्यांदाच झालेल्या लावणीच्या फडात शिट्ट्या अन् टाळ्यांशिवाय प्रेक्षकांची ‘रसिक’ता उफाळून आली नाही.
महाकवी कालिदास कलामंदिरात यापूर्वी दर बुधवारी लावणीचे कार्यक्रम व्हायचे. परंतु, या कार्यक्रमांत अतिउत्साही प्रेक्षकांकडून गोंधळ घालण्याचे प्रकार घडायचे. लावणी कलाकारांकडूनही लावणीच्या नावाखाली तोकड्या कपड्यांमध्ये आयटम सॉँग सादर केले जात असल्याने पे्रक्षक थेट रंगमंचावर धाव घेत नृत्यात सहभागी होत असायचे. शिवाय, प्रेक्षकांकडून खुर्च्यांवर उभे राहून नाचकाम केले जात असल्याने खुर्च्यांची मोडतोड व्हायची. काही प्रेक्षकांकडून कालिदासमध्ये यथेच्छ मद्यपान व धूम्रपानाचाही कार्यक्रम सोबत सुरू असायचा. या साऱ्या प्रकारामुळे कालिदास कलामंदिराची बदनामी होऊ लागली होती. शिवाय, प्रेक्षकांना उत्तेजित करणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी आणण्याची मागणीही सुजाण रसिकांकडून होऊ लागली होती. त्यामुळे महापालिका प्रशासनाने मध्यंतरी लावणीच्या कार्यक्रमांना मनाईच केली होती. दरम्यान, लावणी हा लोककला प्रकार असल्याने त्याचे सादरीकरण त्याच ढंगात व्हायला हवे आणि रंगमंचाचेही पावित्र्य जपले जावे, यासाठी महापालिकेने केवळ पहिल्या सत्रातच लावणीचे कार्यक्रम घेण्यास परवानगी दिली. परंतु, त्यासाठी काही अटी-शर्तीही लादल्या.
यंदाच्या मोसमात पहिल्यांदा बुधवारी (दि. १०) कालिदासमध्ये लावणीचा शो पार पडला. यावेळी आयोजकांनी कार्यक्रमाला आलेल्या प्रेक्षकांवर नजर ठेवण्यासाठी खास व्हिडीओ चित्रीकरणाची व्यवस्था केली. कॅमेरा पूर्णवेळ प्रेक्षकांवर नजर ठेवून असल्याने प्रेक्षकांना केवळ शिट्ट्या आणि टाळ्यांचाच आधार घ्यावा लागला आणि अतिउत्साही प्रेक्षकांनाही आवर घातला गेला. याशिवाय, आयोजकांनी गोंधळ होऊ नये म्हणून प्रेक्षागृहात काही माणसांचीही नेमणूक केली होती.