डोळ्यांचे पारणे फेडणारे रिंगण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 11:17 PM2020-01-19T23:17:26+5:302020-01-20T00:09:33+5:30
जायखेडा येथील श्री संत कृष्णाजी माउली यांच्या पायी दिंडी सोहळ्याचा रिंगण सोहळा रविवारी (दि. १९) अंजनेरी येथील नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाच्या ब्रह्मा व्हॅली शैक्षणिक संकुलाच्या पटांगणावर सौ. यशोदा आक्का यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
त्र्यंबकेश्वर : जायखेडा येथील श्री संत कृष्णाजी माउली यांच्या पायी दिंडी सोहळ्याचा रिंगण सोहळा रविवारी (दि. १९) अंजनेरी येथील नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाच्या ब्रह्मा व्हॅली शैक्षणिक संकुलाच्या पटांगणावर सौ. यशोदा आक्का यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
६९ वर्षांची परंपरा असलेल्या या दिंडी सोहळ्यात हजारो वारकरी १३ दिवसांचा पायी प्रवास करत त्र्यंबकेश्वरी निवृत्तिनाथांच्या चरणी लीन होतात. सातपुड्याच्या पायथी असलेल्या जायखेडा येथून वारकरी सहभागी होतात. ब्रह्मा व्हॅलीचे अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांच्या सहकार्यातून अप्रतिम असा रिंगण सोहळा संपन्न होत असतो. हरिनामाच्या गजरात वारकरी अक्षरश: तल्लीन होतात. ब्रह्मा व्हॅलीच्या बालवारकऱ्यांचे रिंगण सर्वांचे आकर्षण ठरते. रिंगणाचे हे पाचवे वर्ष असून, दरवर्षी भाविकांच्या संख्येत वाढ होत आहे.
याप्रसंगी ह.भ.प. यशोदा आक्का, राजाराम पानगव्हाणे, आचार्य हरिभाऊ, ह.भ.प. जयराम बाबा, विश्वनाथ महाराज, विणेकरी जिभाऊ नाना महाराज यांच्यासह गायनाचार्य सहभागी झाले होते.