नाशिक जिल्ह्यात मृगाने वटारले डोळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 05:14 PM2019-06-19T17:14:04+5:302019-06-19T17:16:12+5:30
पावसाची प्रतीक्षा : खरीपाच्या पेरण्या लांबल्या, पाणीटंचाई तीव्र
नाशिक : मृग नक्षत्र संपायला अवघे दोन दिवस उरले असून अद्याप मान्सूनचे आगमन न झाल्याने जिल्ह्यात खरीपाच्या पेरण्या लांबल्या आहेत. शेतकऱ्यांनी मशागतीची तयारी करुन ठेवली असली तरी मृग नक्षत्रात आतापर्यंत अवघ्या २ टक्के पावसाची नोंद झालेली आहे. मान्सूनचे आगमन लांबल्याने जिल्ह्यातील अनेक गावे व वस्ती-पाड्यांमध्ये पाणीटंचाई अधिक तिव्र बनली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठाही संपुष्टात येत असून अवघा ५ टक्के पाणीसाठा उरल्याने पाणी नियोजनाबाबत प्रशासनाचीही कसरत सुरू आहे.
मृग नक्षत्र आता अंतिम चरणात आहे. ८ जूनला मृग नक्षत्राला प्रारंभ झाला परंतु, अद्याप हवामान खात्याच्या निरीक्षणानुसार, मान्सूनचे महाराष्टत आगमन झालेले नाही. वायू चक्रीवादळामुळे मान्सूनही भरकटल्याचे सांगितले जात आहे. मात्र, गेल्या पंधरा दिवसात जिल्ह्यात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या असल्या तरी त्या खरीपाच्या पेरणीसाठी पुरेशा नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पावसासाठी प्रतीक्षा वाढली आहे. जिल्ह्यात जून महिन्यात सरासरी १५४ मि.मी. पाऊस पडत असतो. मात्र, यंदा मृग नक्षत्र संपायला आले तरी जिल्ह्यात समाधानकारक पावसाची नोंद झालेली नाही. आतापर्यंत जिल्ह्यात १ ते १९ जून या कालावधीत सरासरी २४ मि.मी. पाऊस पडला आहे. मागील वर्षी याच कालावधीत सरासरी ३६.७५ मि.मी. पावसाची नोंद झालेली होती. यंदा २.३७ टक्के इतका पाऊस पडला आहे. पावसाने समाधानकारक हजेरी न लावल्याने त्याचा परिणाम खरीपाच्या पेरणीवर दिसून येत आहे. शेतक-यांनी शेतीची मशागत पूर्ण करून पावसाची प्रतीक्षा चालविली असताना मृग नक्षत्राने डोळे वटारल्याने बळीराजा हतबल झालेला आहे. यंदा जिल्ह्यात दुष्काळाची धग तीव्र बनली आहे. अनेक गावांसह वाड्या-वस्त्यांवर पाणीटंचाईने जनता हैराण झालेली आहे. टॅँकरने होणारा पाणीपुरवठाही अपुरा ठरत आहे. अशा स्थितीत पावसाने ओढ दिल्याने पुन्हा एकदा भयावह संकट उभे राहण्याच्या भीतीने शेतक-यांसह नागरिकांच्या झोपा उडाल्या आहेत.