शहरात पुन्हा एक फेसबुक हॅकिंगचा प्रकार
By Admin | Published: July 14, 2017 01:10 AM2017-07-14T01:10:17+5:302017-07-14T01:10:31+5:30
नाशिक : व्हॉट्सअॅप, फेसबुक या सोशल साइटवरील अकाउंट हॅक होण्याची घटना पुन्हा उघडकीस आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : व्हॉट्सअॅप, फेसबुक या सोशल साइटवरील अकाउंट हॅक होण्याची घटना पुन्हा उघडकीस आली आहे. एका तरुणाच्या फेसबुकवरून त्याच्या ६५६ मित्रांना ‘मोबाइल क्रमांकावर त्वरित रिचार्ज कर, कारण मोठ्या अडचणीत सापडलो’, असा संदेश गेला आणि काहींना शंका आली. त्यामुळे अकाउंट हॅक झाल्याचे समोर आले.
गेल्या आठवड्यामध्ये राजस्थान येथून एका हॅकरला पोलिसांनी अटक केली होती. त्याने महिलांचे सुमारे तीसहून अधिक अकाउंट हॅक केल्याचे समोर आले होते. या घटनेने शहर पोलीस चक्रावले होते. सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने तज्ज्ञांच्या मदतीने तपासचक्रे फिरवून अखेर हॅकरच्या मुसक्या आवळल्या; मात्र शहरातील नेटिझन्सचे सोशल साईट्सवरील अकाउंटवर अद्यापही हॅकर्सची वक्रदृष्टी असल्याचे एका घटनेवरून स्पष्ट होत आहे. मंगळवारी (दि.११) मंगेश बाळू काटे यांच्या फेसबुक अकाउंटवरून त्यांच्या मैत्रीच्या यादीमधील जवळपास ६५६ मित्रांना ‘तातडीने रिचार्ज करा, मी अडचणीत आहे’, असा संदेश पाठविला गेला. काही मित्रांना शंका आल्यामुळे त्यांनी थेट मंगेशसोबत संपर्क साधून विचारले असता त्याने असा कुठल्याही प्रकारचा संदेश पाठविला नसल्याचा खुलासा केला. यावर मित्रांनी त्याला तुझ्या फेसबुक अकाउंटवरून सर्व मित्रांना असा लघुसंदेश गेल्याची कल्पना दिली. यावरून अकाउंट हॅकरने हॅक केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. मंगेश यांनी तत्काळ सायबर पोलीस ठाणे गाठून अज्ञात हॅकरविरुद्ध फिर्याद दिली. पोलिसांनी हॅकरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.