बारावीसाठी ऑनलाईन प्रवेशाची सुविधा ;कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक संस्थांची खबरदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 07:53 PM2020-06-08T19:53:14+5:302020-06-08T19:55:25+5:30
देशभरात लॉकडाऊन लागू केल्यानंतर राज्य सरकारनेही या निर्णयाची अंमलबजावणी केल्याने सध्या राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद असून अशा स्थितीत विद्यार्थ्यांना पुढील वर्षाचे प्रवेश घेण्यासह कोणत्याही शैक्षणिक कामासाठी बाहेर पडणे शक्य नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी नाशिकमधील विविध महाविद्यालयांनी बारावीची ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
नाशिक : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन लागू केल्यानंतर राज्य सरकारनेही या निर्णयाची अंमलबजावणी केल्याने सध्या राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद असून अशा स्थितीत विद्यार्थ्यांना पुढील वर्षाचे प्रवेश घेण्यासह कोणत्याही शैक्षणिक कामासाठी बाहेर पडणे शक्य नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी नाशिकमधील विविध महाविद्यालयांनी बारावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे.
कोरोनाने भारतात शिरकाव केल्यानंतर देशभरात २३ मार्चपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यानंतर शैक्षणिक क्षेत्रातील मंडळ अथवा केंद्र स्तरावरील परीक्षा व निकाल प्रक्रिया पूर्णपणे थांबविण्यात आली असून पहिली ते आठवी आणि नववी व अकरावीचे निकालही विद्यार्थ्यांच्या वार्षिक सरासरी गुणांच्या आधारे जाहीर करण्यात आले. विशेष म्हणजे हे निकालही शाळा महाविद्यालयांनी ऑनलाईन पद्धतीने संस्थेच्या संकेतस्थाळावर प्रकशित करून अथवा फोन, ई-मेल, एसएमएस व्हॉट्सअॅप सारख्या माध्यमांतून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविले. परंतु, आता नवीन शैक्षणिक वर्ष तोंडावर येऊन ठेपले असतानाही शाळा महाविद्यालये सुरु करण्यासंदभात शासनस्तरावर कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे शहरातील विविध शाळा , महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांनी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्याची तयारी केली आहे.यात प्रामुख्याने बारावीच्या प्रवेश प्रक्रियेवर शैक्षणिक संस्थांचा भर असून संस्थांच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे.