माळेगावला सुविधांयुक्त संस्थात्मक विलगीकरण केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:11 AM2021-04-29T04:11:05+5:302021-04-29T04:11:05+5:30
सिन्नर : कोविड बाधितांपासून इतरांना संसर्ग होऊ नये, म्हणून सुविधांयुक्त संस्थात्मक विलगीकरण केंद्र सुरू करणार असल्याची माहिती सरपंच प्रिया ...
सिन्नर : कोविड बाधितांपासून इतरांना संसर्ग होऊ नये, म्हणून सुविधांयुक्त संस्थात्मक विलगीकरण केंद्र सुरू करणार असल्याची माहिती सरपंच प्रिया सांगळे, उपसरपंच रामदास सांगळे यांनी दिली.
गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांनी माळेगाव ग्रामपंचायतीस भेट देऊन कोविडबाबत आढावा घेऊन मार्गदर्शन केले. माळेगाव-मापारवाडी ग्रुप ग्रामपंचायत असून लगतच औद्योगिक वसाहत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतला आहे.
कामगार वर्ग मोठ्या प्रमाणावर असल्याने खोल्या घेऊन कमी जागेत जास्त लोक राहतात. त्यामुळे चार वर्गखोल्यांमध्ये संस्थात्मक विलगीकरण केंद्र सुरू करावे. त्याकरीता आरोग्य विभागाच्यावतीने औषधे पुरविली जातील. दिवसातून दोन वेळा आशांमार्फत ऑक्सिजन लेव्हल घेण्यात येईल. ज्यांना मधुमेह, रक्तदाब, हृदयाचे आजार नसतील त्यांनाच प्रवेश देण्यात यावा, खासगी डॉक्टरांची मदत घ्यावी, असे डॉ. बच्छाव यांनी सांगितले.
प्रभारी ग्रामविकास अधिकारी संजय गिरी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी समूह आरोग्य अधिकारी सुजाता म्हस्के, आरोग्य सेविका अनिता जाधव, रेश्मा जाधव, शीतल निरभवणे, नीता जाधव आदी उपस्थित होत्या.
रुग्णांना मिळेल दोन वेळच्या जेवणासह सुविधा
यावर सरपंच प्रिया सांगळे, उपसरपंच रामदास सांगळे, ग्रामपंचायत सदस्य कैलास सांगळे, महेंद्र सांगळे, रतन जाधव, सविता सांगळे, पूजा गवारे, विजया जाधव यांनी चर्चा करून गावातील नागरिकांच्या आरोग्यासाठी सुविधांयुक्त असे संस्थात्मक विलगीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला.
-----------------
ग्रामपंचायतीचा सहभाग
विलगीकरण कक्षातील दाखल रुग्णांना सकाळी चहा, दूध, अंडी, दोन वेळचे जेवण, पलंग, गादी, बेडशिट, आवश्यक तसेच सर्जिकल साहित्य ग्रामपंचायत निधीमधून उपलब्ध करून देण्यात येईल. कोविडच्या संकटात नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी ग्रामपंचायत सहभाग घेईल, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.