नवीन वर्षात विद्यार्थिनींची राहण्याची होणार सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 07:46 PM2019-12-09T19:46:43+5:302019-12-09T19:49:33+5:30
ग्रामीण भागात शैक्षणिक सोयींच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणावर मुली शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जात असल्याची बाब लक्षात आली आहे. त्यात गावापासून शाळा दूर असणे, शाळेत जाण्यासाठी बस, वाहनाची सोय नसणे,
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्यातील चार आदिवासी तालुक्यातील विद्यार्थिनींची शैक्षणिक गळती रोखण्याबरोबरच त्यांना शिक्षण व निवासाची सोय करणाऱ्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात यंदा नवीन शैक्षणिक वर्षापासून इगतपुरी व पेठ तालुक्यातील वसतिगृहात सोय करण्यात येणार आहे. त्यामुळे या तालुक्यातील अति दुर्गम भागातील विद्यार्थिनींना बारावीपर्यंत शिक्षण घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ग्रामीण भागात शैक्षणिक सोयींच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणावर मुली शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जात असल्याची बाब लक्षात आली आहे. त्यात गावापासून शाळा दूर असणे, शाळेत जाण्यासाठी बस, वाहनाची सोय नसणे, आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्याने शैक्षणिक खर्च करण्याची कुवत नसणे, आई-वडील शेतीकाम करीत असताना घर सांभाळणे अशा अनेक कारणांमुळे मुली शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे पाहून शासनाने काही वर्षांपूर्वी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात इयत्ता सहावी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थिनींच्या शिक्षणाची व निवासाची सोय करण्यात येते त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, पेठ, सुरगाणा व त्र्यंबकेश्वर या चार तालुक्यांमध्ये प्रायोगिक पातळीवर हा प्रयोग राबविण्यात येऊन साधारणत: चारशे विद्यार्थिनींची सोय करण्यात आली होती. इगतपुरी व पेठ तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळेमध्येच अशी व्यवस्था करण्यात आली होती. या योजनेस ग्रामीण भागातील व विशेषत: आदिवासी विद्यार्थिनींचा मिळणारा प्रतिसाद पाहता, इगतपुरी व पेठ तालुक्यांत विद्यार्थिनींच्या वसतिगृहासाठी नवीन इमारत बांधण्यात आली आहे, तर सुरगाणा व त्र्यंबक तालुक्यांत अनुक्रमे आदर्श समता शिक्षण संस्था व ग्रामोदय शिक्षण प्रसारक या खासगी शिक्षण संस्थांकडे त्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
इगतपुरी व पेठ येथील वसतिगृहाचे काम पूर्ण झाल्याने जून महिन्यापासून या दोन्ही तालुक्यांतील नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींच्या निवासाची सोय होणार असल्यामुळे या वसतिगृहातील विद्यार्थिनींची काळजी घेण्यासाठी गृहप्रमुख, मुख्य स्वयंपाकी, सहायक स्वयंपाकी, चौकीदार असे विविध पदे भरण्यास शासनाने अनुमती दिली आहे. येत्या काही दिवसांत ही पदे भरली गेल्यास वसतिगृहासाठी विद्यार्थिनींच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात होईल.