‘रेस अॅक्रॉस अमेरिका’मध्ये फडकला तिरंगा
By admin | Published: June 30, 2015 12:23 AM2015-06-30T00:23:21+5:302015-06-30T00:32:39+5:30
‘रेस अॅक्रॉस अमेरिका’मध्ये फडकला तिरंगा
नाशिक : नऊ दिवसांचा कालावधी अन् ४८०० किलोमीटरची सातत्यपूर्ण सायकल स्पर्धा. अमेरिकेच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत कधी अत्यंत उष्ण, कधी अत्यंत थंड तर कधी वादळी वारा अन् पाऊस, डोंगरदऱ्यांमधून जाणार मार्ग, तीव्र चढ आणि तीव्र उतार अशा नैसर्गिक, भौगोलिक परिस्थितीचा सामना करत मोठ्या जिद्दीने नाशिकचे भूलतज्ज्ञ डॉ. हितेंद्र महाजन, दंतरोग तज्ज्ञ डॉ. महेंद्र महाजन या बंधूंनी भारतीय प्रमाण वेळेनुसार आठ दिवस अन् १४ तासांत रेस अॅक्रॉस (रॅम) स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करत देशाचा तिरंगा फडकविला. ‘टूर द फ्रान्स’ या सायकल रेस स्पर्धेपेक्षाही अत्यंत खडतर व अवघड समजली जाणारी ‘रेस अॅक्रॉस अमेरिका’ ही स्पर्धा गेल्या २० जूनपासून अमेरिकेच्या कॅलिफोर्निया शहरातून सुरू झाली होती. ही स्पर्धा २९ जून रोजी संपली. स्पर्धेमध्ये सहभागी सायकलस्वारांना नऊ दिवसांमध्ये सुमारे चार हजार आठशे किलोमीटर अंतर कापण्याचे आव्हान होते. सायकलपटू महाजनबंधूंनी आत्मविश्वास, जिद्द व कठोर परिश्रम अन् सरावाच्या जोरावर यशस्वीपणे स्पर्धा पूर्ण केली. ही स्पर्धा पूर्ण करणारे हे प्रथम भारतीय स्पर्धक ठरले. तसेच यंदा आशिया खंडातून त्यांचा एकमेव सहभाग होता. अद्याप या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना ४८०० कि.मी.चे अंतर कापता आलेले नाही. स्पर्धेसाठी मिळालेल्या आर्थिक मदतीतून हे बंधू आदिवासी गरजूंवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व आय ट्रान्सप्लांट करणार आहेत. एकूणच गरजूंचे अनारोग्य रोखण्यासाठी जास्तीत जास्त खर्च या डॉक्टर बंधूंक डून केला जाणार आहे.