ठेकेदार पकडल्याच्या चर्चेने महापालिकेत पळापळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 01:02 AM2019-08-29T01:02:50+5:302019-08-29T01:03:21+5:30
महापालिकेच्या मुख्यालयात एका ठेकेदारास पकडल्याची एकच चर्चा पसरली आणि त्यानंतर गोंधळ उडाला. महापालिकेत कोणत्याही अभ्यागताला दरवाजे बंद करून दुपारी तीन वाजेनंतरच या असे सुरक्षारक्षकांनी सांगितल्यानंतर आणखीन गोंधळ झाला.
नाशिक : महापालिकेच्या मुख्यालयात एका ठेकेदारास पकडल्याची एकच चर्चा पसरली आणि त्यानंतर गोंधळ उडाला. महापालिकेत कोणत्याही अभ्यागताला दरवाजे बंद करून दुपारी तीन वाजेनंतरच या असे सुरक्षारक्षकांनी सांगितल्यानंतर आणखीन गोंधळ झाला. महापालिकेत एसीबीचा सापळा रचल्याची आणि ठेकेदाराला पकडल्याची चर्चा पसरली, परंतु नंतर ठेकेदाराला एसीबीने नव्हे तर आयुक्तांनी वेळेपूर्वी मुख्यालयात आल्याने पकडले, असा खुलासा झाला आणि वातावरण शांत झाले.
बुधवारी (दि.२८) हा प्रकार घडला. राजीव गांधी भवनात अभ्यागतांना प्रवेश दुपारी तीन वाजेनंतरच असतो. सकाळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शांततेत काम करता यावे यासाठी ही व्यवस्था असली तरी त्याचे उल्लंघनदेखील केले जाते. विशेषत: ठेकेदार सकाळपासून केव्हाही महापालिकेत येतात. नागरिकांना मात्र नियमाच्या पालनाला सामोरे जावे लागते. बुधवारी (दि.२८) आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे महापालिकेत आगमन झाले आणि ते कार्यालयात जात असताना मोबाइल फोनचा आवाज आल्याने आयुक्तांना शंका आली त्यांनी संबंधिताला विचारले असता त्याने ठेकेदार असल्याचे सांगितल्याने आयुक्तांनी वेळेपूर्वी ठेकेदारांना मध्ये कसे काय सोडतात, असा प्रश्न करून सुरक्षारक्षकांना जाब विचारला. त्यामुळे सुरक्षारक्षकांनी साऱ्यांचीच विचारपूस सुरू केली. तथापि, ठेकेदाराला पकडले, अशी चर्चा पसरल्याने गोंधळ उडाला.
अधिकारीच बोलावतात ठेकेदारांना
महापालिकेच्या वतीने अभ्यागतांना प्रवेशासाठी तीन वाजेनंतरचीच वेळ आहे. त्यामुळे प्रवेशव्दारावर सुरक्षा कर्मचारी त्यांना अडवतात. मात्र, दुसरीकडे अधिकारीच ठेकेदारांना बोलावतात आणि सुरक्षा कर्मचाºयांना त्यांना मुख्यालयात सोडणे भाग पाडते, अशी वेगळीच कैफियत सुरक्षारक्षकांनी मांडली आहे.