दुसऱ्या दिवशीही अपयश
By admin | Published: August 3, 2015 10:53 PM2015-08-03T22:53:57+5:302015-08-03T22:55:03+5:30
कृ त्रिम पाऊस : दहा दिवसांनंतर पुन्हा करणार प्रयत्न
येवला : कृत्रिम पाऊस पडण्याची उत्सुकता शिगेला असताना जड पावलांनी रविवारी माघारी परतलेल्या टीमने सोमवारी सकाळी ७ वाजेपासून अथक परिश्रम घेत ठरावीक वेळेच्या अंतराने उडविलेल्या सात ग्यान रॉकेट्सपैकी केवळ एकाने लक्ष गाठले मात्र तेही कृत्रिम पाऊस पाडण्यास अयशस्वी ठरले. सहा रॉकेट्स फुसके ठरले.
सातत्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागणाऱ्या येवला तालुक्यात मान्सूनचे आगमन होऊनही पावसाने पाठ फिरविल्याने या परिसरात कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी नवी मुंबईच्या इंटरनॅशनल स्कूल आॅफ प्रोफेशनल स्टडिज या संस्थेने दाखवून रविवारी दिवसभर कृत्रिम पाऊस पाडण्याचे प्रयत्न केले; मात्र अपेक्षित वातावरण तयार न झाल्याने रविवारी रॉकेट्स उडविली गेली नाही. परिणामी जमलेल्या हजारो ग्रामस्थांची निराशा झाली. सोमवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास पुन्हा या पथकाने प्रयत्न केले.
कृत्रिम पाऊस पडण्यासाठी ७० टक्के पेक्षा अधिक आर्द्रता व काळे ढग वातावरणात होते. या परिस्थितीत साखर हे इंधन वापरून मोटारच्या सहाय्याने रॉकेट उडवण्याचा प्रयत्न सुरू झाला. पहिले रॉकेट सकाळी ७ वाजता उडवले गेले. परंतु हा फुसका बार ठरला. हे रॉकेट दिशाहीन होऊन मीडिया टीमच्या डोक्यावरून निघून गेले. १५ मिनिटांच्या अंतराने दुसऱ्या रॉकेटने आकाशात उड्डाण केले.
हे उड्डाण यशस्वी झाले असले तरी ढग विखुरले गेल्याने कृत्रिम पाऊस पडलाच नाही. नवी मुंबईच्या इंटरनॅशनल स्कूल आॅफ प्रोफेशनल स्टडिज या पथकाचे प्रमुख अब्दुल रहेमान वान्नो व टीमने हार न मानता सलग पाच रॉकेट आकाशात सोडण्याचा प्रयत्न केला. या पैकी दोन रॉकेटनी जागेवरच धूर सोडला. एक रॉकेट २०० मीटर आकाशात झेपवून पुन्हा जमिनीवर कोसळले. ते दोन फूट जमिनीत रुतले. बघ्याची गर्दी कमी असल्याने अनर्थ टळला. एका रॉकेटने तर रिमोट चालवण्यापूर्वीच पेट घेतला.
आता औरंगाबाद येथे अमेरिकेच्या रडार यंत्रणेचा वापर करून औरंगाबाद परिसरात कृत्रिम पावसाचा प्रयोग होणार असल्याने शेतकऱ्यांचे त्या प्रयोगाकडे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)