उपद्रव : रात्री १० वाजेनंतर परवानगी नको गायकवाड सभागृहाच्या ध्वनिप्रदूषणाचा त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 01:00 AM2018-04-07T01:00:28+5:302018-04-07T01:00:28+5:30
नाशिक : महापालिकेने भाभानगर येथे सुमारे तीन हजार आसनक्षमतेचे उभारलेले कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह आता परिसरातील रहिवाशांना नकोसे ठरू लागले आहे.
नाशिक : महापालिकेने भाभानगर येथे सुमारे तीन हजार आसनक्षमतेचे उभारलेले कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह आता परिसरातील रहिवाशांना नकोसे ठरू लागले आहे. गायकवाड सभागृहाकडे वाढणारी वर्दळ, त्यातून निर्माण होणारा गोंगाट, वाहनतळाची समस्या आणि सभागृहातील ध्वनिप्रदूषणामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सदर सभागृहात रात्री १० वाजेनंतर कार्यक्रमांना परवानगी नाकारण्याची मागणी रहिवाशांनी महापालिका आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे, गायकवाड सभागृहात दिवसेंदिवस कार्यक्रमांची संख्या वाढत आहे. सदर सभागृह हे दोन बाजूने उघडे असल्याने सभागृहातील आवाज बाहेर येतो. सभागृहातील ध्वनिव्यवस्था सदोष आहे. व्हीआयपी प्रवेशद्वारासमोर सहा मीटरचा रस्ता आहे. तेथे दोन्ही बाजूला प्रेक्षक आपली वाहने लावतात. याशिवाय, कॉलनी रस्त्यावरही वाहने सर्रास उभी करून दिली जातात. रिक्षावाल्यांचीही मोठ्या प्रमाणावर गर्दी आणि त्यांचा उपद्रव वाढत आहे. कर्णकर्कश हॉर्नमुळे ध्वनिप्रदूषण वाढले आहे. कार्यक्रमांच्या दिवशी फेरीवाल्यांचीही गर्दी होत असते. याठिकाणी त्यांचाही मोठा उपद्रव वाढला आहे. रस्ता सहा मीटर रुंदीचा आहे. रहिवाशांना ध्वनिप्रदूषणाबरोबरच वाहतूक कोंडीचा नेहमीच त्रास सहन करावा लागतो. याशिवाय, कार्यक्रमाच्या आदल्या दिवसापासून मंडप-डेकोरेशनवाल्यांची वर्दळ दिसून येते. त्यांचाही त्रास सहन करावा लागतो. सभागृहात डिसेंबर ते फेबु्रवारी या काळात रोज शाळा-महाविद्यालयांची स्नेहसंमेलने होत असतात. त्यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षार्थी विद्यार्थी रहिवाशांना त्रास होतो. याबाबत वारंवार नगरसेवकांकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. त्यामुळे आयुक्तांनी याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.