फज्जा : बेकायदेशीर कत्तलखाना विरोधी मोहीम

By admin | Published: August 19, 2014 12:01 AM2014-08-19T00:01:39+5:302014-08-19T01:20:11+5:30

मनपा-पोलीस पथक रिकाम्या हाताने परतले

Faja: The illegal slaughterhouse campaign | फज्जा : बेकायदेशीर कत्तलखाना विरोधी मोहीम

फज्जा : बेकायदेशीर कत्तलखाना विरोधी मोहीम

Next

मालेगाव : येथील बेकायदेशीर कत्तलखान्यांवर कारवाई करण्याच्या प्रशासनाच्या गुप्त मोहिमेला ‘घरका भेदी’ मुळे फज्जा उडाला आहे. त्यामुळे शनिवारी भल्या पहाटे शहराच्या अंतर्गत भागात बेकायदेशीर कत्तलखान्यांवर कारवाई करण्यास गेलेल्या महानगरपालिका व मालेगाव पोलीस दलाच्या दोनशे जणांच्या पथकास रिकाम्या हाताने परतावे लागले.
शहरात मनपाचा एक अधिकृत तर अनेक अनधिकृत कत्तलखाने आहेत. यासंबंधीची संपूर्ण माहिती मनपा व पोलिस प्रशासनाला देखील आहे. उघडयावरील, लोकवस्तीतील बंदीस्त घरांमध्ये चालणाऱ्या या कत्तलखान्यातील रक्तमिश्रीत मांस सरळ गटारीद्वारे मोसमनदीपात्रात मिसळले जाते. उघड्यावरच निरुपयोगी मांसकचरा फेकला जातो. त्यामुळे जल - वायुप्रदुषण होवून साथीचे रोग पसरतात. यासंदर्भात वेळोवेळी विविध नागरिक व सामाजिक संघटनांनी केलेल्या तक्रारीनंतरही मनपातर्फे कधी पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी तर कधी
पोलिस बंदोबस्ताअभावी या बेकायदेशीर कत्तलखान्यांवर थेट कारवाई करण्याचे टाळण्यात येत होते.
मात्र अलिकडच्या काळात या बेकायदेशीर कत्तलखान्यांमुळे संपूर्ण शहरवासियांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरवासियांसोबत येथील विविध पाळीव प्राणीदेखील विविध आजारांनी त्रस्त आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून तर शहरात मोठ्या प्रमाणात डास, चिल्टे, माशा व विविध किटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यापार्श्वभूमीवर मनपा प्रशासनातर्फे शहरातील कमालपुरा, कसाबवाडा व प्रभाग तीनच्या कार्यालयामागील सर्व्हे क्रमांक १६ चा परिसर या भागातील बेकायदेशीर कत्तलखान्यांवर कारवाई करण्याचे निश्चित करण्यात आले. पोलिस प्रशासनानेही बंदोबस्त पुरविण्याचे मान्य केले. त्यानंतर मनपा व पोलिस प्रशासनाने गुप्तपणे या मोहिमेचे नियोजन केले. फक्त मोहिमेत सहभागी करुन घेतल्या जाणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनाच याची माहिती देण्यात आली.
निश्चित केलेल्या प्लॅनप्रमाणे मनपा व पोलिस प्रशासनाचा जवळपास दीडशे ते दोनशे कर्मचारी अधिकारी दहा ते बारा वाहनांच्या ताफ्यासह दोन्ही बाजूने संबंधित भागात भल्या पहाटे चार ते पाच वाजेच्या दरम्यान शिरले. मात्र जेथे दिवसरात्र अवैध कत्तलखाने सुरु असतात. त्याठिकाणी प्रचंड शांतता होती. अवैध कत्तलखाने चालविणाऱ्यापैकी कुणीही तेथे उपस्थित नव्हते. हत्यारेही नव्हती. होती फक्त आपल्या कत्तलीची वाट पाहत बांधलेली - कोंबलेली मुकी जनावरे. मनपा व पोलिस अधिकाऱ्यांनी सदर परिसर पिंजून काढला परंतु त्यांना ना अवैध कत्तल करणारे सापडले ना त्यांची हत्यारे. प्रचंड गुप्तता पाळूनही आपल्या मोहिमेची बातमी फुटलीच कशी या अविर्भावात मोहिमेतील सहभागी अधिकारी - कर्मचारी एकमेकांकडे पाहत होती. तास दीडतासाच्या शोधाशोधनंतर सदर पथक परतले व पुन्हा दीडतासाने त्याच जागी परतले. मात्र परिस्थिती जैसे थे होती. त्यामुळे बेकायदेशीर कत्तलखान्यांवर कायदेशीर कारवाईचे मोठे नियोजन करुन गेलेल्या मनपा व पोलिसाच्या पथकास कारवाईविना रिकाम्या हाताने परतावे लागले. मनपा व पोलिस प्रशासनाकडून या ‘घरका भेदी’चा शोध घेतला जात असला तरी बेकायदेशीर कत्तलखाने मालकांचा तो ‘मित्र’ सापडणे अवघडच असल्याची शक्यता दोन्ही प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.

Web Title: Faja: The illegal slaughterhouse campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.