लॉन्समध्ये चालणारा बनावट देशी दारूचा कारखाना उध्वस्त; 12 संशयित ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 12:05 AM2021-10-12T00:05:01+5:302021-10-12T00:06:20+5:30
सुमारे एक कोटीचा मुद्देमाल जप्त
नाशिक : निफाड तालुक्यातील चांदोरी शिवारात असलेल्या उदय राजे लॉन्स मागील काही दिवसांपासून चक्क बनावट देशी दारू निर्मितीचा कारखाना सुरू असल्याची धक्कादायक बाब पोलिसांच्या छाप्यानंतर उघडकीस आली आहे. सायखेडा पोलीस ठाणे हद्दीत ग्रामीण पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी त्यांच्या विशेष पथकासह सोमवारी (दि.11) रात्री उशीरा धाड टाकून हा कारखाना उध्वस्त केला. लॉन्स मधून सुमारे एक कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी या कारवाईत जप्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सायखेडा पोलीस ठाणे हद्दीत चांदोरी शिवारात उदयराजे नावाचे एक लॉन्स आहे. या ठिकाणी अवैधरित्या बनावट देशी दारू तयार करण्याचा 'उद्योग' तेजीत असल्याची गोपनीय माहिती नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळाली. त्यांनी त्वरित त्यांचे ग्रामीण पोलीस पथक तयार करुन चांदोरी शिवारात उदयराजे लॉन्सवर रात्री 11 वाजेच्या सुमारास धाड टाकली.
यावेळी तेथे संशयित संजय मल्हारी दाते (४७, रा-गोंदेगाव ता. निफाड) हा पोलिसांच्या हाती लागला. त्याच्या कब्जातून बनावट देशी दारूचे अंदाजे १५०० ते २००० बॉक्स, अंदाजे १०,००० ते १५,००० देशी दारूच्या रिकाम्या बाटल्यासह अंदाजे 20 हजार लिटर स्पिरीट (200 लिटरचे 100 ड्रम), 10 हजार देशी दारूचे रिकामे खोके तसेच देशी दारूसाठी लागणारे इतर साहित्य, पाच पाण्याच्या टाक्या, एक ट्रक असा सुमारे एक कोटींचा ऐवज जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. हा बनावट देशी दारूचा अवैध कारखाना अंबादास विठोबा खरात यांच्या मालकीच्या उदयराजे लॉन्समध्ये सुरु होता असे पोलिसांनी सांगितले. या कारवाईत रात्री उशिरापर्यंत 12 संशयितांना ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले होते. उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या कारवाईपासून सायखेडा पोलिसांना चार हात दूर ठेवण्यात आल्याची चर्चा तालुक्यात आहे.