बनावट सॅनिटायझरचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 12:25 AM2020-03-15T00:25:43+5:302020-03-15T00:27:16+5:30
कोरोना व्हायरसपासून बचावासाठी निर्जंतूक द्रव्याला (सॅनिटायझर) मागणी वाढली आहे. दरम्यान, गोळे कॉलनीतील दोन ठोक औषध विक्रेत्यांनी बनावट सॅनिटायझरचा मोठा साठा विक्रीच्या उद्देशाने केल्याचे छापेमारीत उघड झाले आहे. जिल्हा रुग्णालय व अन्न-औषध प्रशासनाच्या भरारी पथकांनी सलग दोन दिवसांत गोळे कॉलनी व सिडको भागात केलेल्या छापेमारीत १ लाख ६० हजारांचा अवैध सॅनिटायझरचा मोठा साठा जप्त केला आहे.
नाशिक : कोरोना व्हायरसपासून बचावासाठी निर्जंतूक द्रव्याला (सॅनिटायझर) मागणी वाढली आहे. दरम्यान, गोळे कॉलनीतील दोन ठोक औषध विक्रेत्यांनी बनावट सॅनिटायझरचा मोठा साठा विक्रीच्या उद्देशाने केल्याचे छापेमारीत उघड झाले आहे. जिल्हा रुग्णालय व अन्न-औषध प्रशासनाच्या भरारी पथकांनी सलग दोन दिवसांत गोळे कॉलनी व सिडको भागात केलेल्या छापेमारीत १ लाख ६० हजारांचा अवैध सॅनिटायझरचा मोठा साठा जप्त केला आहे.
कोरोनापासून बचावासाठी सॅनिटायझरच्या वापरास प्राधान्य दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर बाजारात बनावट सॅनिटायझरची निर्मिती व विक्रीची शक्यता लक्षात घेता दोन भरारी पथकांची नियुक्ती प्रशासनाकडून करण्यात आली आहे. बनावट सॅनिटायझरची विक्री होत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे सहआयुक्त दुष्यंत भामरे यांच्या नेतृत्वाखाली औषध निरीक्षक डॉ. सुरेश देशमुख, जीवन जाधव, चंद्रकांत मोरे यांच्या भरारी पथकाने शनिवारी गोळे कॉलनीमधील मे. राहुल एन्टरप्रायजेस, मे. आशापुरी एजन्सीच्या दालनात छापे मारले. औषध निरीक्षक सु. सा. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पथकाने केलेल्या या कारवाईत बनावट सॅनिटायझरचा विक्रीसाठी साठा केल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. सुमारे १ लाख ६० हजारांचा साठा हस्तगत करण्यात आला आहे. प्रतिबंधित केलेला हा साठा प्रथमदर्शनी विनापरवाना उत्पादित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संबंधित विक्रेत्यांची अधिक चौकशी सुरू असून याबाबत माहिती घेण्याचे काम भरारी पथकाकडून रात्री उशिरापर्यंत सुरू होते. तसेच मे. जयसन एन्टरप्रायजेस या एजन्सीवर भरारी पथकाने छापा मारून बनावट बाटल्यांचा साठा जप्त केला.
दोन भरारी पथके कार्यान्वित
भरारी पथकांमध्ये एकूण चार सदस्यांचा समावेश आहे. यामध्ये जिल्हा रुग्णालय, मनपा आरोग्य विभागांचे प्रत्येकी एक डॉक्टरसह औषध विभागाचे दोन औषध निरीक्षक आणि वैद्यमापन शास्त्र विभागाचे कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ही पथके शहरात कार्यान्वित करण्यात आली असून, बनावट सॅनिटायझरच्या विक्रीसह सॅनिटायझरचा तुटवड्याला कारणीभूत ठरणाºया साठेमारीवरही लक्ष ठेवून आहेत.
कच्च्या मालाचा तुटवडा
सॅनिटायझरचा अचानकपणे वापर वाढल्यामुळे मागणीत वाढ झाली आहे. वाढत्या मागणीच्या तुलनेत सॅनिटायझर उत्पादक कंपन्यांनाही सरकारकडून निर्देश देण्यात आले आहे; कच्च्या मालाची चणचण असल्याने सॅनिटायझरचे उत्पादनाचे प्रमाण वाढविण्याकरिता अडचणी उद्भवत असल्याचे औषध विभागाकडून सांगण्यात आले.