शहरात मुलींच्या जन्मदरात घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 12:24 AM2018-05-13T00:24:29+5:302018-05-13T00:24:29+5:30
शहरात गेल्या वर्षी एप्रिलमध्ये दर हजारी मुलांमागे असलेले मुलींच्या जन्मदराचे प्रमाण १२०० इतके होते. ते मार्च २०१८ मध्ये घसरून ९२१ वर आले आहे. एकीकडे शहरात महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत प्रसूतिपूर्व लिंगनिदानविरोधात मोहीम राबविली जात असताना मुलींच्या जन्मदरात झालेली घसरण चिंतेची व मोहिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे.
नाशिक : शहरात गेल्या वर्षी एप्रिलमध्ये दर हजारी मुलांमागे असलेले मुलींच्या जन्मदराचे प्रमाण १२०० इतके होते. ते मार्च २०१८ मध्ये घसरून ९२१ वर आले आहे. एकीकडे शहरात महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत प्रसूतिपूर्व लिंगनिदानविरोधात मोहीम राबविली जात असताना मुलींच्या जन्मदरात झालेली घसरण चिंतेची व मोहिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी २०१७ मध्ये एप्रिल महिन्यात मुलींचा जन्मदर १२०० पर्यंत जाऊन पोहोचलेला होता. परंतु, मार्च २०१८ मध्ये जन्मदर ९२१ वर आला आहे. जानेवारी २०१८ मध्ये मुलींचा जन्मदर दरहजारी मुलांमागे ९३७, फेबु्रवारीत ९६७ तर मार्च २०१८ मध्ये ९२१ इतका घसरला आहे. वाढत्या स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी प्रसूतिपूर्व निदानतंत्र कायदा १९९४ लागू करण्यात आलेला आहे. त्यानुसार, प्रसूतिपूर्व लिंगनिदान करणे कायद्याने गुन्हा आहे. महापालिकेमार्फत सदर कायद्यानुसार, सातत्याने मोहीम राबवत अनधिकृत सोनोग्राफी सेंटरवर नजर ठेवली जाते. काही महिन्यांपूर्वी महापालिकेने सातपूरमधील एका डॉक्टरने चक्क इनोव्हात सोनोग्राफी सेंटर सुरू केल्याचा प्रकार उघडकीस आणला होता. मोहिमेनंतरही शहरात दर हजारी मुलांमागे मुलींचा जन्मदर घसरल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.