कांद्यापाठोपाठ टमाट्यात घसरण; उत्पादक हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 11:15 PM2020-01-29T23:15:53+5:302020-01-30T00:09:08+5:30
कांद्याच्या दरात सातत्याने घसरणीचे वातावरण असताना टमाटा कवडीमोल दरात विक्र ी करण्याची वेळ उत्पादकांवर आल्याने उत्पादक आर्थिक कोंडीत सापडले आहेत.
वणी : कांद्याच्या दरात सातत्याने घसरणीचे वातावरण असताना टमाटा कवडीमोल दरात विक्र ी करण्याची वेळ उत्पादकांवर आल्याने उत्पादक आर्थिक कोंडीत सापडले आहेत. सध्या उपबाजारात कांदा व टमाट्याची आवक होते आहे. कांदा दरातील घसरण तितकीशी नसली तरी टमाट्याने न्यूनतम दराची पातळी गाठली आहे.
तीस रु पये जाळीपासून शंभर रु पये जाळीपर्यंतचा दर सध्या मिळतो आहे. टमाटा खुडणी वाहतूक खर्चही अंगावर पडत असून, उत्पादन खर्चही निघणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे उत्पादकांची अवस्था विकताही येत नाही व फेकताही येत नाही अशी झाल्याने पदरात पडेल त्या दरात टमाटा विक्र ी करणे एवढेच उत्पादकांच्या हातात आहे.
दरम्यान धुळे जिल्ह्यातील साक्र ी भागातील टमाटा सध्या उजवा ठरत आहे. आकारमान व चवीलाही उत्तम असल्याने हा टमाटा नवापूर व गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी जात आहे. राजस्थानमध्येही समाधानकारक उत्पादन असल्याने तेथील मागणीही घटली आहे, तर उर्वरित राज्यामध्ये अपेक्षित मागणी राहिली नाही. परिणामी जिल्ह्यातील टमाट्याच्या मागणीचा आलेख घसरला आहे. त्याचा परिणाम दर घसरणीत झाल्याने उत्पादक कोंडीत सापडले आहेत. दरम्यान, उपबाजारात येणारे परप्रांतीय व्यापारीही थंडावले असून, टमाट्याची आवक मोठ्या प्रमाणावर असूनही मागणी व ग्राहकांअभावी टमाटा मातीमोल दरात विकण्याची वेळ उत्पादकांवर आली आहे.