कोबी, टमाट्याच्या भावात घसरण
By admin | Published: October 30, 2014 10:24 PM2014-10-30T22:24:47+5:302014-10-30T22:25:05+5:30
शेतकरी चिंतातुर : उत्पादन खर्च निघेना; माल रस्त्यावर फेकण्याची वेळ
खामखेडा/सिन्नर : परिसरात यंदा मोठ्या प्रमाणावर कोबी व टमाट्याची लागवड करण्यात आली आहे. मात्र या दोन्ही पिकांचे भाव घसरल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.
परिसरामध्ये दरवर्षी कोबी व टमाट्याचे मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते; परंतु चालू वर्षी उशिरा पावसामुळे टमाटा पिकाचे बियाणे उशिरा टाकल्यामुळे रोपे उशिरा तयार झाली आणि पिकांची लागवड उशिरा करण्यात आली. मध्ये तर या पिकांवर करप्या व अळीचा प्रादुर्भाव दिसून आला होता; परंतु शेतकऱ्याने महागडी अशी औषधांची फवारणी करून पिके तयार केली होती. आता भावामध्ये प्रचंड प्रमाणात घट होऊन दोन ते तीन रुपये भाव मिळत असल्याने उत्पादन खर्च भरून मिळत नाही.
एक गोणी कोबीची मजुरी ३५ रुपये द्यावे लागते आणि सुरत किंवा बडोदा येथे घेऊन जाण्यासाठी ५० रुपये खर्च येतो. तेथे आडतचा विचार केल्यानंतर शेतकऱ्यांच्या हातामध्ये काहीच मिळत नाही आणि स्थानिक व्यापाऱ्याला विचारले तर तो दोन किंवा अडीच रुपये किलो मागतो. तेव्हा बियाणे आणि फवारणीचा आणि तो बाजारामध्ये घेऊन जाण्याचा विचार केल्यास शेतकऱ्याची शेती तोट्यात जात आहे. तसेच टमाटा पिकांबाबतही शेतकरी मेटाकुटीला आला आहे. टमाट्याच्या २० किलो के्रटला ५० ते ६० रुपये भाव मिळत आहे. मजुरीचे पैसेही हाती येत नाही. त्याची मार्केटमध्ये तोलाई, भाराई वाहतूक खर्च हा स्वत: शेतकऱ्याला खिशातून करावा लागत आहे. या हाताशी आलेल्या पिकांचे काय करावे हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. कारण आता गुजरातमधील कोबीचे उत्पादन सुरू झाल्याने कोबीचे भाव कमी झाले, असे कोबी दिसत आहे. तेव्हा आता पिकासाठी उसनवार आणलेले पैसे कसे परत करावे, असा प्रश्न शेतकऱ्याला सतावत आहे.
सिन्नरच्या पश्चिम पट्ट्यातील मुख्य पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टमाट्याचे भाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. गेल्या आठवड्यापासून सतत गडगडणारे भाव गुरुवारी टमाट्याची आवक कमी झाल्याने काहीसे सुधारले असले तरी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च फिटणे अवघड झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.(वार्ताहर)