आवक वाढल्याने कांदा भावात घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 02:42 PM2019-02-15T14:42:00+5:302019-02-15T14:42:10+5:30
लासलगाव : लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समिती आवारात दररोज कांद्याची आवक वाढत चालली असून वाहने उभी करण्यास बाजार समित्यांना जागा अपुरी पडत आहे.
लासलगाव : लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समिती आवारात दररोज कांद्याची आवक वाढत चालली असून वाहने उभी करण्यास बाजार समित्यांना जागा अपुरी पडत आहे. एकटयÞा लासलगाव बाजार समितीत दररोज २० हजारपेक्षा अधिक क्विंटल इतकी आवक होत आहे. प्रचंड उत्पादन आणि मागणीचा अभाव यामुळे महिनाभरात कांदा दरात प्रति क्विंटलला सरासरी ११० रूपयांनी घट झाली आहे. गेल्या महिन्यात लासलगाव बाजारात कांद्याला सरासरी ५७५ रूपये भाव मिळाला होता. या महिन्यात तो सरासरी ४६० रु पयांपर्यंत खाली आला आहे. येथील बाजार समितीत कांद्याची प्रचंड आवक सुरू असताना गुजरातमधील कांदा बाजारात आला आहे. या कांद्याचा आकार आणि दर्जा चांगला असल्याने पंजाब, दिल्ली, हरियाणा या प्रमुख बाजारपेठेत गुजरातच्या कांद्याची मागणी वाढत आहे. नाशिकच्या बरोबरच पुणे, चाकण, लोणंद भागात गावठी कांदा बाजारात आल्याने लाल कांद्याच्या निर्यातीवर परिणाम झाला. सध्या व्यापारी निर्यात मलेशिया, दुबई, कोलंबो येथे सुरू आहे. रेल्वेने देशभरात कांदा पाठविण्याकरीता व्यापारी वर्गाचे वतीने मोठ्या प्रमाणावर रेल्वे रोजची मागणी आहे. तसेच रेल्वे प्रशासनही तातडीने हे रॅक उपलब्ध करून देत आहे. गौरमालदा, व्यासनगर व चित्तपुर येथे रेल्वे रॅकची मागणी वाढली आहे. लासलगाव येथून काल एक रेल्वे रेक तर गौरमालदा निफाड रेल्वे स्थानकावर व्यासनगर येथे रेल्वे रेक रवाना झाला. कांद्याची आवक दररोज मोठ्या प्रमाणात वाढत असून शेतकऱ्यांकडील वाढत्या कांदा आवकेने लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समिती आवारात वर प्रचंड आवक होत असल्याने वाहने उभी करण्यास जागा बाजार समित्यांना अपुरी पडत आहे.