डाळींच्या भावात घसरण : वर्षभराचा साठा करण्यासाठी नाशिककरांची लगबग गहू दोनशे, तर तांदूळ तीनशे रुपयांनी महागला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 12:40 AM2018-04-08T00:40:53+5:302018-04-08T00:40:53+5:30
नाशिक : यावर्षी गहू, तांदूळ व डाळींच्या उत्पादनात वाढ झाल्याने बाजारात नवीन पीक दाखल झाल्यानंतर घाऊक बाजारातील भाव काही अंशी कमी होती अशी आशा होती.
नाशिक : यावर्षी गहू, तांदूळ व डाळींच्या उत्पादनात वाढ झाल्याने बाजारात नवीन पीक दाखल झाल्यानंतर घाऊक बाजारातील भाव काही अंशी कमी होती अशी आशा होती; परंतु सरकारने गव्हाच्या किमान आधारभूत किमतीत २०० रुपयांची वाढ केल्याने गेल्या वर्षाच्या तुलनेत गव्हाचे भाव १०० ते २०० रुपयांनी, तर तांदळाचे भाव २०० ते ३०० रुपयांनी वाढले आहेत. नाशिककरांनी संपूर्ण वर्षासाठी अन्नधान्य साठवण्याचे नियोजन सुरू केले आहे. येत्या काळात गव्हासह तांदूळ व डाळींचे भाव वाढण्याची शक्यता असल्याने नागरिक वर्षभरासाठी आवश्यक असलेले गहू, तांदूळ, डाळी साठविण्याचे नियोजन करीत आहेत. गेल्या दोन वर्षांपूर्वी सप्टेंबर, आॅक्टोबर या महिन्यांच्या कालावधीत डाळींचे भाव गगनाला भिडले होते. तूर डाळ तर दोनशे रुपये प्रतिकिलोपर्यंत जाऊन पोहोचली होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अनेकजण डाळींचे भाव कमी असल्याने त्या साठवून ठेवण्याच्या पवित्र्यात आहेत. उन्हाळ्यात वडे, पापड यांसारखे वाळवणाचे पदार्थ करण्यासाठी हरभरा डाळ व उडीद डाळीचीही मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. शेवया, कुरडयांसाठी विशेष गव्हाची ग्राहकांकडून खरेदी होत आहे, तर वर्षाच्या गरजेसाठी शरबती आणि लोकवण गव्हाला नागरिकांची अधिक पसंती आहे. अनेकजण महाराष्ट्रातच उत्पादित होणारा अजित १०२ व मोहन वंडर गव्हाची खरेदी करीत आहेत. यंत्राद्वारे कापणी करून काढलेल्या व चाळण केलेल्या गव्हाला अधिक मागणी असल्याचे दुकानदार सांगतात.