भावजयीचा गळा आवळून स्वत:ही घेतला फास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 12:46 AM2017-08-25T00:46:07+5:302017-08-25T00:46:38+5:30
येथील मेरी रासबिहारी लिंकरोडवरील लक्ष्मी रेसिडेन्सीमध्ये एका सदनिकेत दीर-भावजयीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्रियासिंग विकासकुमार शर्मा (२७) यांचा श्रीरामकुमार सतेंद्र शर्मा (२५) याने गळा आवळून खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पंचवटी : येथील मेरी रासबिहारी लिंकरोडवरील लक्ष्मी रेसिडेन्सीमध्ये एका सदनिकेत दीर-भावजयीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्रियासिंग विकासकुमार शर्मा (२७) यांचा श्रीरामकुमार सतेंद्र शर्मा (२५) याने गळा आवळून खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
याबाबत पंचवटी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भावजयी प्रियासिंग यांचा मृतदेह जमिनीवर तर श्रीरामकुमार याचा मृतदेह पंख्याच्या आधारे दोरीला लटकलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आला. श्रीरामकुमार याने भावजयीचा गळा आवळला व त्यानंतर स्वत: गळफास घेतला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. भावजयीच्या गळ्यावर दोरीने आवळल्याच्या खुणाही पोलिसांना आढळून आल्या आहेत. प्रियासिंग त्यांचा पती विकासकुमार व श्रीरामकुमार हे एकाच सदनिकेत राहात होते. विकासकुमार शर्मा हे बाहेरगावाहून घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मूळ बिहार राज्यातील शर्मा हे कामानिमित्ताने नाशिकला राहात असून, मार्केटिंगचे काम करतात तर पत्नी व दीर हे घरीच राहात होते. गुरु वारी (दि.२४) सकाळी घटना उघडकीस आल्यानंतर सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण, पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर, उपनिरीक्षक महेश इंगोले, शैलेंद्र म्हात्रे, संजय वानखेडे आदींनी घटनास्थळी धाव घेतली.
‘बर्थ-डे’ची केली होती तयारी मार्केटिंगचे काम असल्यामुळे प्रियासिंग यांचे पती विकासकुमार हे सातत्याने दोन ते तीन दिवस बाहेरगावी जात असे. गुरुवारी विकासकुमार यांचा वाढदिवस असल्यामुळे‘सेलिब्रेशन’साठी घरामध्ये तयारीही करण्यात आली होती. भिंती फुग्यांनी सजविण्यात आल्या होत्या. तसेच वाढदिवसाचा केक व कॅटबरीही आणून ठेवल्याचे पोलिसांना आढळून आले; मात्र विकासकुमार यांच्या घरी येण्यापूर्वीच दीर व भावजयीमध्ये नेमका काय वाद झाला अन् त्याचे पर्यावसन हत्त्या व आत्महत्त्येमध्ये झाले यामागील गूढ अद्याप कायम आहे.
अनैतिक संबंधाची शक्यता?
दीर-भावजयीमध्ये अनैतिक संबंध असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. कदाचित या अनैतिक संबंधातून बुधवारी रात्री दोघांमध्ये वाद निर्माण झाला असावा आणि या वादातूनच दिराने भावजयीचा गळा आवळला व नंतर स्वत:ही आत्महत्त्या केली, असा अंदाज पोलिसांनी बांधला आहे. शवविच्छेदन व वैद्यकीय तपासणी अहवालानंतर यामागील कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. बुधवारी मध्यरात्री विकासकुमार हे नवापूर येथून घरी परतले. घराचा दरवाजा ठोठावला असता आतून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने शेजाºयांच्या मदतीने दरवाजाची कडी तोडली. त्यावेळी घरातील बेडरूममध्ये भाऊ श्रीरामकुमार हा पंख्याला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत तर पत्नी जमिनीवर आढळून आली. त्यांनी तत्काळ भावाचा मृतदेह उतरविला व पत्नी आणि भाऊ अशा दोघांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविले; मात्र सदर रुग्णालयाने उपचारासाठी दाखल करून न घेता ‘पोलीस केस’ सांगत नकार दिला. त्यामुळे शर्मा यांनी दोघांना जिल्हा रुग्णालयात हलविले असता तेथे वैद्यकीय अधिकाºयांनी दोघांना तपासून मयत घोषित केले.