साकोरेतील मुर्ती दृष्टांतामुळे सापडल्याचा दावा फोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 01:39 AM2018-07-17T01:39:28+5:302018-07-17T01:39:35+5:30
नांदगाव तालुक्यातील साकोरे येथे खोदकामात सापडलेल्या तेराव्या शतकातील प्राचीन मूर्ती भगवान आदिनाथ यांनी स्वप्नात दिलेल्या दृष्टांतानुसार सापडल्याचा संबंधीतांचा दावा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने खोडून काढला आहे
नाशिक : नांदगाव तालुक्यातील साकोरे येथे खोदकामात सापडलेल्या तेराव्या शतकातील प्राचीन मूर्ती भगवान आदिनाथ यांनी स्वप्नात दिलेल्या दृष्टांतानुसार सापडल्याचा संबंधीतांचा दावा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने खोडून काढला आहे. अंनिसचे जिल्हा प्रधान सचिव उदयकुमार कुºहाडे व जिल्हा कार्यवाह महेंद्र दातरंगे यांनी सोमवारी (दि़१६) पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली़
गंजमाळ येथील एका हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना कुºहाडे यांनी सांगितले की, साकोरे येथील संतोष कासलीवाल या इसमाने गत दहा वर्षांपासून भगवान आदिनाथ हे स्वप्नात येऊन दृष्टांत देत होते, असे दावा केला होता़ ११ जुलै २०१८ रोजी झालेल्या दृष्टांतानुसार त्यांनी गुरुवारी (दि़१२) पहाटे गावातील नदीकिनारी खोदकाम केल्यानंतर भगवान आदिनाथ यांच्या इ़स़ १३३६ मधील दोन प्राचीन मूर्ती मिळाल्या़ या मूर्तींनी तीन वेळा रंग बदलल्याचा दावाही कोतवाल यांनी केला़ होता. या मूर्तींची गावातून मिरवणूक काढून मुनिश्री भूविसागर यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करून त्या जैन मंदिरात ठेवण्यात आल्या आहेत. आणखी २१ मूर्ती निघणार असल्याचे भाकीतही याबाबतीत कोतवाल यांनी केले होते़ दरम्यान, अंनिसचे राज्य सरचिटणीस शहाजी भोसले, प्रशांत कांबळे तसेच उदय कुºहाडे हे चमत्काराचे सत्यशोधन करण्यासाठी रविवारी (दि़१५) साकोरे येथे गेले होते़ त्यांनी मूर्ती सापडलेले ठिकाण व मूर्तींची पाहणी केल्यानंतर १३३६ साली मराठी भाषा नसतानाही या मूर्तींवरील मराठी लिखाण तसेच जमिनीपासून एकदम वर मिळालेल्या मूर्ती पहाता हे ठरवून केलेले कृत्य असल्याचे त्यांच्या लक्षात आले़ यानंतर त्यांनी संदीप कोतवाल व त्यांच्या पत्नीशी मूर्तींच्या रंग बदलण्याबाबत चर्चा केली असता दोघांच्या बोलण्यामध्ये साम्य आढळले नाही़ अंनिसच्या कार्यकर्त्यांनी कोतवाल यांना जादूटोणा कायद्यानुसार हा अजामीनपात्र गुन्हा असल्याचे निदर्शनास आणून देताच सदर बनाव आपणच रचल्याचे कबुल केल्याचा दावा अंनिसने केला आहे.