बनावट कागदपत्रांद्वारे भूमाफियाकडून गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 12:59 AM2018-06-24T00:59:13+5:302018-06-24T00:59:28+5:30
वडिलोपार्जित जमिनीमध्ये खोट्या कागदपत्रांच्या आधारे स्वामित्वदोष निर्माण करत स्वत: मालक असल्याचे भासवून एका भामट्याने वीस लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
नाशिक : वडिलोपार्जित जमिनीमध्ये खोट्या कागदपत्रांच्या आधारे स्वामित्वदोष निर्माण करत स्वत: मालक असल्याचे भासवून एका भामट्याने वीस लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित किशोर मोहनलाल सुगंध याने बनावट कागदपत्रांद्वारे साठेखत व मुखत्यारपत्र तयार करून अहमदाबाद येथे राहणाऱ्या एका वृद्धासह घटनेतील साक्षीदार हेमराज पाटील यांची फसवणूक केली. अहमदाबादच्या सायन सिटी येथे गौतम शांतिलाल मिश्री हे राहत असून, संशयित सुगंध याने जून २००८ मध्ये मिश्री यांच्या खासगी मालकीच्या पंचवटीतील दिंडोरीरोडवर असलेल्या सिटी सर्व्हे क्र. १३२/७/२/मधील ३९८२५.५७ चौरस मीटरपैकी १४८५.७८ इतक्या क्षेत्राचे बनावट कागदपत्रे तयार करून त्याआधारे साठेखत व मुखत्यारपत्र बनविले आणि स्वत: मालक असल्याचे भासवून त्याने मिश्री व त्यांच्या नातेवाइकांच्या खोट्या स्वाक्षºया केल्या. पाटील यांना चक्क २० लाखांना गंडा घातल्याचे फिर्यादीत मिश्री यांनी म्हटले आहे. सुगंधविरुद्ध अशा पद्धतीचा फसवणुकीचा गुन्हा यापूर्वी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल आहे. या प्रकरणी मिश्री यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुगंधविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यायालयात खटला
संशयित सुगंध दाम्पत्य यांची टोळी असून, वडिलोपार्जित जमिनींचा शोध घेत मूळ मालकाच्या नावाने खोटी कागदपत्रे तयार करून परस्पर जमीन विक्री करण्याचा बेकायदेशीर व्यवसायामध्ये यापूर्वीही सुगंधवर गुन्हा दाखल आहे. सरकारवाडा पोलीस ठाण्यात नितीन रामचंद्र खोत यांनी फसवणुकीचा गुन्हा सुगंधविरुद्ध २००६ साली दाखल केला असून, फौजदारी न्यायालयात या गुन्ह्णाचा खटला सुरू आहे. या खटल्यात सुगंध हा प्रथम क्रमांकाचा संशयित आरोपी आहे. गायकवाड मळा भागात खोत यांची वडिलोपार्जित जमीन आहे. सुमारे चार एकर जागेची खोटी कागदपत्रे तयार करून सुगंधने स्वत:सह पत्नी रेखाच्या नावावर जागेची खरेदी केल्याचा गुन्हा आहे.
धमकावून उकळले वीस लाख
गौतम मिश्री व हेमराज पाटील यांच्यात जमिनीचा व्यवहार २०१४ साली झाला; मात्र सुगंध याने सदर जमिनीची खोटी कागदपत्रे तयार क रून स्वत: जमीन मालक असल्याचे सांगून पाटील यांना धमकावले. न्यायालयात दावाही दाखल केला आणि मागील वर्षी वीस लाख रुपये उकळले. संशयित सुगंध हा फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहे.