भाजीबाजारातील कचराकुंडीमुळे दुर्गंधीचे साम्राज्य
By admin | Published: May 19, 2014 11:51 PM2014-05-19T23:51:13+5:302014-05-20T00:27:34+5:30
गंगाघाट : कचरा टाकणार्यांवर कारवाईची मागणी
गंगाघाट : कचरा टाकणार्यांवर कारवाईची मागणी
पंचवटी : गंगाघाटावरील भाजीबाजारालगत उघडयावर केरकचरा टाकून नागरीकांनी कचराकुंडी तयार केल्याने परिसराला कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. उघडयावर पडलेल्या केरकचर्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले असुन महापालिकेच्या संबंधित विभागाकडून दंडात्मक कारवाई केली जात नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याची तक्रार नागरीकांनी केली आहे.
पंचवटीतील प्रभाग क्रमांक १२ चे प्रतिनिधीत्व माजी प्रभाग सभापती लता टिळे व मनसे शहरअध्यक्ष राहूल ढिकले करीत आहेत. धार्मिक क्षेत्र असलेल्या या गंगाघाटावर दैनंदिन हजारो भाविक देवदर्शनासाठी येत असतात. गंगाघाटावरील भाजीबाजारासमोरील रस्त्यावरून जातांना या भाविकांना तर नाकातोंडावर रुमाल ठेऊनच मार्गक्रमण करावे लागते. महापालिकेच्या वतीने दैनंदिन कचरा उचलण्याचे काम केले जात असले तरी कधी कधी उशिरापर्यंत साचून राहणार्या कचर्यामुळे नागरीकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. प्रशासनाने याठिकाणी पथक कार्यान्वीत करून कचरा टाकणार्यांवर कारवाई केल्यास परिसर निश्चितच स्वच्छ राहिल व नागरीकांना दुर्गंधीचा सामना करावा लागणार नाही. (वार्ताहर)
भाजीविक्रेत्यांनीच केली कचराकुंडी
गंगाघाटावरील साईबाबा मंदीरासमोर असलेल्या मोकळया पटांगणात भाजी विक्रेते सडलेला व कुजका भाजीपाला आणून टाकतात. परिणामी मोकाट जनावरे या कुजलेल्या शेतमालावर ताव मारतात. भाजीबाजारात भाजी विक्री करणारे विक्रेतेच कचरा टाकत असल्याची तक्रार नागरीकांनी केली आहे.