कर चुकविण्यासाठी बनावट परवाने
By admin | Published: September 12, 2014 12:53 AM2014-09-12T00:53:03+5:302014-09-12T00:53:03+5:30
कर चुकविण्यासाठी बनावट परवाने
नाशिक : प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स कंपनीने एकाच परवान्यावर दोन बसेसवर सारखेच क्रमांक टाकून प्रादेशिक परिवहन विभागाची (आरटीओ) कर चुकवेगिरी केल्याची बाब शहर वाहतूक विभागाने उघडकीस आणली असून, सारख्याच क्रमांकाच्या चार बसेस ताब्यात घेतल्या आहेत. या प्रकरणी साईनाथ ट्रॅव्हल्स कंपनीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात येऊन असाच प्रकार अन्य ट्रॅव्हल्स कंपन्याही करीत असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या बसेसला आरटीओकडून अनुमती देताना दरवर्षी २८ हजार रुपये कर आकारणी केली जाते, ही बाब हेरून द्वारका भागातील साईनाथ ट्रॅव्हल्स कंपनीने एकाच बसची आरटीओकडे नोंदणी करून एकाच क्रमांकाच्या दोन बसेससाठी हा परवाना वापरात आणण्याची युक्ती शोधून काढली. त्यात प्रामुख्याने एमएच १५ एके १३०० व एमपी ०७ पी-१३०० या बसेसचा समावेश आहे. या संदर्भातील माहिती मिळताच शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक रमेश पाटील, दुय्यम निरीक्षक श्रीमनवार, हवालदार शेळके, मनियार आदिंनी साईनाथ ट्रॅव्हल्सच्या सारख्याच क्रमांकाच्या बसेसचा शोध घेण्यास सुरुवात केली असता, औरंगाबादरोडवरील चौधरी यात्रा कंपनीच्या बस डेपोमध्ये एक बस सापडली, तर दुसरी बस साईनाथ ट्रॅव्हल्सच्या पाठीमागे उभी होती. ब्रह्मा व्हॅली अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी एक बस देण्यात आल्याची, तर चौथी बस सिन्नरला असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी तातडीने तपासचक्र फिरवून क्रेनच्या साह्याने या बसेस ताब्यात घेतल्या. त्यावेळी ट्रॅव्हल्स चालकाने सारख्याच क्रमांकाच्या बसेसच्या नंबरप्लेटमध्ये खाडाखोड करण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एका बसमध्ये डाळिंबाचे ६३ कॅरेट भरलेले आढळून आले व त्या बसवर संदीप फाउंडेशन या शैक्षणिक संस्थेचे नाव होते. ही बसही ट्रॅव्हल्स चालकाने संदीप फाउंडेशनला भाड्याने दिली
होती. शहरात अशा प्रकारे पहिलाच प्रकार उघडकीस आल्याने पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांनी ट्रॅव्हल्स चालक श्रीकांत श्रीराम मंत्री (रा. नाशिकरोड) यास चौकशीसाठी ताब्यात घेतले असता, त्याने आरटीओचा रस्ता वाहतूक कर चुकविण्यासाठी हा सारा उद्योग केल्याची कबुली दिली. गेल्या चार ते पाच वर्षांपासून एकाच क्रमांकावर दोन व त्यापेक्षा अधिक बसचा वापर खासगी प्रवासी वाहतुकीसाठी केला जात होता. (प्रतिनिधी)