मान्यतेच्या बेडीत ‘लॉकअप
By admin | Published: September 20, 2016 12:48 AM2016-09-20T00:48:46+5:302016-09-20T00:49:56+5:30
इंदिरानगर पोलीस ठाणे : अधिकारी, कर्मचाऱ्यांना अनेक अडचणी
’संजय शहाणे ल्ल इंदिरानगर
येथील पोलीस ठाण्यातील लॉकअपला अद्यापही मान्यता मिळाली नसल्याने सदर लॉकअप शोभिवंत वस्तू बनली आहे. लॉकअप मान्यतेचा अद्याप प्रस्ताव मांडला नसल्याने अधिकारी व कर्मचारी वर्गास अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
इंदिरानगर परिसरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्हेगारीमुळे इंदिरानगरसाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. त्यासाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, संघटना व नागरिकांनी वेळोवेळी आंदोलने, निवेदने दिली. यानंतर जनतेच्या भावनांची कदर करीत स्वतंत्र पोलीस ठाण्याला मंजुरी दिली. १ एप्रिल २0१0 ला इंदिरानगर पोलीस ठाण्याची निर्मिती झाली. इंदिरानगरला स्वमालकीची इमारत बांधून तयार न झाल्याने तीन वर्षांच्या भाडेतत्त्वावर राजीवनगर झोपडपट्टीच्या लगत असलेल्या एका अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये पोलीस स्टेशन सुरू करण्यात आले होते. एका फ्लॅटमध्ये सुरू करण्यात आलेल्या पोलीस ठाण्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांसह विविध विभागास स्वतंत्र व्यवस्था आणि लॉकअपअभावी मोठी गैरसोय झाली होती. त्यामुळे स्वमालकीच्या जागेच्या शोधात असताना सुमारे ४३ वर्षांपूर्वी पोलिसांच्या वाहन दुरुस्तीसाठीच्या ताब्यात घेतलेल्या जागेचा शोध २0११ मध्ये लागला. त्यामुळे स्वमालकीच्या जागेत नूतन इमारतीचा मार्ग मोकळा झाला होता. तसेच संशयित गुन्हेगारांना भद्रकाली, अंबड, नाशिकरोड आदि पोलीस ठाण्यात ने-आण करण्यासाठी होणारी अडचण दूर होणार होती. पोलीस ठाण्याच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच कालावधीपेक्षा सुमारे दीड वर्षानंतर पोलीस ठाण्याचे काम पूर्ण झाले.
या भागात विविध गुन्हे घडत असतात आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती वाढत आहेत. त्यामुळे पोलिसांनी संशयित गुन्हेगारांना पकडल्यानंतर त्यांच्या चौकशीसाठी अटक करण्यात येते तेव्हा गुन्हेगारांना लॉकअपमध्ये ठेवण्यासाठी भद्रकाली, अंबड किंवा नाशिकरोड येथे ने -आण करावी लागते. त्यामुळे वेळ लागतो. तसेच ने-आण करताना गुन्हेगार पळून जाण्याची शक्यता टाळता येत नाही. त्यासाठी इंदिरानगर पोलीस ठाण्यास लॉकअपला मंजुरी मिळणे आवश्यक आहे. (वार्ताहर)झोपडपट्टी भागात अनेक वेळा कोम्बिंग दि. १ एप्रिल २0१६ रोजी पोलीस ठाण्याचा लोकार्पण सोहळा झाला होता. परंतु अद्यापपर्यंत लॉकअपला मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कारण इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडाळागाव, सावित्रीबाई झोपडपट्टी, अण्णा भाऊ साठेनगर, पिंगुळबाग, राजीवनगर झोपडपट्टी आदि भागात अनेक वेळा पोलिसांनी कोम्बिंग व आॅल आउट आॅपरेशन राबविले आहे.