खुनाचा उगलडा : प्रेयसीला ‘डिनर’ दिल्यानंतर प्रियकराने केला खून; मृतदेह गोणीत भरून फेकला बंधा-याच्या पाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 11:08 PM2018-01-18T23:08:36+5:302018-01-18T23:11:10+5:30
२७ नोव्हेंबर २०१७ रोजी दिंडोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेगण शिवारात बंधाºयाच्या पाण्याच्या पात्रात एका गोणीमध्ये अनोळखी युवतीचे प्रेत आढळले होते. या प्रेताचा चेहरा अत्यंत विद्रुप करण्यात आला होता, जेणेकरून तिची ओळख पटू नये. तसेच संशयित बाजीराव सांगळे (रा.मखमलाबाद) याने त्याच्या मित्राच्या मदतीने हात-पाय बांधून प्रेत गोणीत भरले होते व त्यावर दगडही भरून पाण्यात फेकून दिले होते.
नाशिक : गुन्हेगाराने कितीही शिताफीने गुन्हा केला तरी तो फारसा लपून राहत नाही. गुन्हा करताना केलेला बनाव आणि पुरावे नष्ट करण्याच्या प्रयत्नात गुन्हेगार एक तरी लहानसा ‘सुराग’ सोडून जातो आणि त्याआधारे पोलीस त्यास बेड्या ठोकतात,असे विविध चित्रपटामधून पहावयास मिळते. असाच एका गुन्ह्याचा सुराग ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला मिळाला. पोलिसांनी आंबेगण शिवारातील बंधाºयात आढळलेल्या युवतीच्या मृतदेहाची ओळख पटवून मुख्य संशयित आरोपी मयत मुलीच्या प्रियकर संशयित बाजीराव सांगळे यास बेड्या ठोकल्या.
याबाबत अधिक माहिती अशी, २७ नोव्हेंबर २०१७ रोजी दिंडोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेगण शिवारात बंधा-याच्या पाण्याच्या पात्रात एका गोणीमध्ये अनोळखी युवतीचे प्रेत आढळले होते. या प्रेताचा चेहरा अत्यंत विद्रुप करण्यात आला होता, जेणेकरून तिची ओळख पटू नये. तसेच संशयित बाजीराव सांगळे (रा.मखमलाबाद) याने त्याच्या मित्राच्या मदतीने हात-पाय बांधून प्रेत गोणीत भरले होते व त्यावर दगडही भरून पाण्यात फेकून दिले होते. प्रेत पाण्यात तरंगू नये, याची खबरदारीदेखील संशयित आरोपीने घेतली होती. याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता व पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रकरणाचा तपास ग्रामीण गुन्हे शाखेला सोपविण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक करपे, उपनिरीक्षक नितीन पाटील, दत्ता हांडगे, चेतन मोरे, राजेश काकड, प्रशांत काकड आदींनी घटनास्थळ पिंजून काढले.
असा लागला सुगावा
मृतदेहाचे निरीक्षण करत मुलीच्या पँटवर असलेल्या बेल्टचे बक्कल पोलिसांनी बारकाईने निरीक्षण करत त्यावरील शिक्का व शैक्षणिक संस्थेचे बोधचिन्ह ओळखून शहरासह जिल्ह्यातील नामांकित शैक्षणिक संस्थेच्या सर्व शाळा-महाविद्यालयांमध्ये तपास सुरू केला. दरम्यान, शहरासह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमधील बेपत्ता मुलींची माहिती मिळविली. यावेळी मखमलाबादमधील एक मुलगी दीड ते दोन महिन्यांपासून बेपत्ता असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांच्या हाती लागली. त्यानुसार पोलिसांनी गंगानाथ कपिलेश्वर झा यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या बेपत्ता मुलीबाबत चौकशी केली. यावेळी कुटुंबीयांनी असल्याचे सांगितले. ती विवाहित असल्यामुळे बहुतेक सासरी गेली असावी, असा कयास कुटुंबीयांनी बांधल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी मृतदेहाचे कपडे, अन्य वस्तू दाखविले असता कुटुंबीयांनी ते ओळखले व मृतदेह सोनालीचा असल्याची खात्री पटली.