संभाजी राजे यांच्या समर्थनार्थ आझाद मैदानावर सहकुटुंब आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2022 01:17 AM2022-02-24T01:17:33+5:302022-02-24T01:17:54+5:30
खासदार संभाजी राजे शनिवारी (दि.२६) मुंबईत आझाद मैदानावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात संभाजी राजे छत्रपती यांच्यासोबत नाशिक जिल्ह्यातील हजारो कुटुंब उपोषणाला बसणार असल्याची घोषणा नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी बुधवारी (दि.२३) नाशिकमध्ये केली.
नाशिक : खासदार संभाजी राजे शनिवारी (दि.२६) मुंबईत आझाद मैदानावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात संभाजी राजे छत्रपती यांच्यासोबत नाशिक जिल्ह्यातील हजारो कुटुंब उपोषणाला बसणार असल्याची घोषणा नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी बुधवारी (दि.२३) नाशिकमध्ये केली.
संभाजी राजे यांच्या आमरण उपोषणाला सक्रिय पाठिंबा देण्यासंदर्भातील नियोजन करण्यासाठी बुधवारी (दि.२३) औरंगाबाद रोडवरील वरदलक्ष्मी लाॅन्सवर नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाची बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून शेकडो प्रमुख समन्वयक उपस्थित होते. मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट झाल्यानंतर मराठा समाजाला न्याय मिळण्यास होणारा विलंब लक्षात घेऊन संभाजी राजे यांनी राज्य आणि केंद्र सरकारला मराठा समाजाचे उभय सरकारांच्या हातात असलेले मुद्दे सोडवून दिलासा देण्याचा प्रस्ताव दिला होता. राज्य शासनाने हा प्रस्ताव स्वीकारल्यानंतर यासंदर्भात संभाजी राजे व मराठा क्रांती मोर्चाच्या काही समन्वयकांसोबत बैठकाही झाल्या. परंतु सरकारकडून यासंदर्भात कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप करतानाच समन्वयकांनी संभाजी राजे यांच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देण्याची घोषणाही केली. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर, तुषार जगताप, गणेश कदम, मनीषा पवार, शिवाजी मोरे, उमेश शिंदे, विजय खर्जुल, अशिष हिरे, विलास जाधव, सचिन पवार, संदीप लबडे, बंटी भागवत, संजय सोमासे, विशाल कदम दिनकर कांडेकर, प्रमोद जाधव, शिवा तेलंग, खंडू आहेर, वंदना कोल्हे, अस्मिता देशमाने, पूजा धुमाळ, माधवी पाटील, पूजा तेलंग, पूनम पवार यांच्यासह जिल्हाभरातील समन्वयक उपस्थित होते.
मराठा समाजाच्या मागण्या
स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले आणि न्यायालयाने निर्देशित केलेल्या मराठा उमेदवारांना तत्काळ पूर्वलक्षी नियुक्त्या देण्यात याव्यात.
कोपर्डीतील पीडितेला न्याय देण्यासाठी पूर्व निकालाला दिले गेलेले आव्हान खोडून काढण्यासाठी न्यायिक प्रक्रियेला वेग देण्यात यावा, तसेच स्पर्धा परीक्षांसाठी मराठा तरुण पात्र बनविण्यासाठी योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी अशा निवडक मुद्यावर सरकारने तत्काळ निर्णय घ्यावा, अशी खासदार संभाजी राजे आणि सकल मराठा समाजाची मागणी आहे. या साध्या मागण्याही सरकार केराच्या टोपलीत टाकीत असल्याचा आरोप करीत मराठा क्रांती मोर्चाने संभाजी राजे यांच्यासोबत शनिवारी (दि.२६) आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.