ताणतणाव दूर करण्यासाठी कौटुंबिक संवाद गरजेचा : आनंद नाडकर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 12:22 AM2018-10-29T00:22:56+5:302018-10-29T00:24:45+5:30
बदलत्या जीवनशैलीचा परिणाम माणसाच्या व्यक्तिगत जीवनाबरोबरच कौटुंबिक जीवनावर झाला आहे़ या बदलामुळे माणसाचा कुटुंबासमवेत संवाद हरपला असून, तो अधिकाधिक ताणतणावग्रस्त होत चालला आहे़ हा ताणतणाव दूर करून सुखी जीवन जगायचे असेल तर कौटुंबिक सुसंवाद, आध्यात्मिक दृष्टिकोन व सत्य स्वीकारण्याची मानसिकता गरजेची असल्याचे प्रतिपादन मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी केले.
नाशिक : बदलत्या जीवनशैलीचा परिणाम माणसाच्या व्यक्तिगत जीवनाबरोबरच कौटुंबिक जीवनावर झाला आहे़ या बदलामुळे माणसाचा कुटुंबासमवेत संवाद हरपला असून, तो अधिकाधिक ताणतणावग्रस्त होत चालला आहे़ हा ताणतणाव दूर करून सुखी जीवन जगायचे असेल तर कौटुंबिक सुसंवाद, आध्यात्मिक दृष्टिकोन व सत्य स्वीकारण्याची मानसिकता गरजेची असल्याचे प्रतिपादन मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी केले.
मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटतर्फे महाकवी कालिदास कलामंदिरात रविवारी (दि़२८) आयोजित करण्यात आलेल्या ‘आनंद रहा, निरोगी जगा’ या कार्यक्रमात ते बोलत होते़ डॉ.सुधीर संकलेचा व वैशाली बालाजीवाले यांनी विचारलेल्या प्रश्नांवर डॉ़ नाडकर्णी व डॉ़ मनोज चोपडा यांनी मनाचे व्यापार, मानसिक ताण-तणाव, आजारपण यावर विश्लेषण करून आनंदी जीवनाचे रहस्य उलगडून दाखविले. माणूस हा भौतिक सुखाच्या मागे लागल्याने मानसिक ताण-तणाव वाढले आहेत़ व्यसनाधिनता, ताणतणाव चिंता या समस्यांवर नातेसंबंधातून मिळणारा आधार हे प्रभावी औषध असून, जवळच्या व्यक्तींशी मनमोकळा संवाद, छंदामध्ये स्वत:ला गुंतवणे तसेच डॉक्टर, मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणे आवश्यक असल्याचे नाडकर्णी यांनी सागितले़ प्रारंभी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल, विनिता सिंघल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले़ याप्रसंगी आमदार देवयानी फरांदे, डॉ.कैलास कमोद, डॉ. रश्मी चोपडा, प्रशांत हिरे, डॉ. राज नगरकर आदि उपस्थित होते़
डॉक्टरांवरील हल्ले होतील कमी...
रुग्ण, नातेवाईक व डॉक्टर या तिन्ही घटकांनी वास्तव परिस्थितीचा स्वीकार करणे गरजेचे आहे़ डॉक्टरांना रुग्ण व नातेवाइकांचा आधार खूप महत्त्वाचा असतो, रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना डॉक्टरांनी वास्तव परिस्थितीची माहिती दिली व त्यांनी सहकार्य केले तर डॉक्टरांवरील हल्ले नक्कीच कमी होतील, असे डॉ़ नाडकर्णी यांनी सांगितले़