ऑक्सिजन गळतीतील मृतांचे कुटुंब उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:16 AM2021-05-21T04:16:24+5:302021-05-21T04:16:24+5:30

सातपूर येथील सोमेश्वर कॉलनीत राहणारे पंढरीनाथ देवचंद नेरकर (वय ३९) हे मूळचे मालेगाव तालुक्यातील चिंचगव्हाण गावचे. नाशकात आल्यानंतर नेरकर ...

The family of the deceased in the oxygen leak opened | ऑक्सिजन गळतीतील मृतांचे कुटुंब उघड्यावर

ऑक्सिजन गळतीतील मृतांचे कुटुंब उघड्यावर

Next

सातपूर येथील सोमेश्वर कॉलनीत राहणारे पंढरीनाथ देवचंद नेरकर (वय ३९) हे मूळचे मालेगाव तालुक्यातील चिंचगव्हाण गावचे. नाशकात आल्यानंतर नेरकर हे सकाळी दूधविक्रीचा व्यवसाय करायचे. त्यानंतर ते किचन ट्रॉली बसवून देण्याचे काम करत असत. त्यांचा अतिशय हरहुन्नरी, कष्टाळू आणि प्रेमळ स्वभाव होता. मोठे बंधू नंदू नेरकर यांनी त्यांना गावाहून तीन वर्षांपूर्वी नाशिकला आणले होते. चार भावांचे एकत्र कुटुंब असलेल्या पंढरीनाथ नेरकर (सर्वात लहान) यांचे चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना अडीच वर्षाचा मुलगा आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, तीन भाऊ आणि त्यांचे कुटुंबीय असा परिवार आहे.

इन्फो..

बेड मिळाला पण जीव गेला...

म्हाडा कॉलनीतील जाधव संकुल परिसरातील सुनील भीमा झालटे (वय ३३) यांनी सुरुवातीला किरकोळ त्रास होऊ लागल्याने खासगी दवाखान्यात उपचार घेतले. श्वास घ्यायला त्रास होऊ लागला म्हणून शहरातील अनेक दवाखान्यांत ऑक्सिजन बेड मिळतो का, म्हणून त्यांचे शालक अविनाश बिऱ्हाडे यांनी शोधाशोध केली. अखेर महानगरपालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात नंबर लावला. तेथेही बेड शिल्लक नव्हता. वेटिंगनंतर नंबर लागला. पहिल्या दिवशी पहिल्या मजल्यावर उपचार घेतले. दुसऱ्या दिवशी कोरोना संशयितांसाठी असलेल्या दुसऱ्या मजल्यावर हलविण्यात आले. कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता, पण पांढऱ्या पेशी कमी झाल्याने त्रास होत होता. त्यामुळे ऑक्सिजन लावण्यात आला होता. शेवटी काळाने झडप घातलीच. सुनील झालटे हे केवल पार्क येथील ओमसाई एंटरप्राइजेस या ट्रान्सपोर्ट कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.

इन्फो...

नशिबानेच नाशिकमध्ये दाखल झाल्या अन्...

सातपूर येथील शिवाजी नगरमधील जिजामाता कॉलनीत राहणाऱ्या सुगंधाबाई भास्कर थोरात (वय ६५) या मूळच्या नांदगावच्या. परंतु, सध्या नाशिकमध्ये स्थायिक. कोरोना संसर्गाची लागण झाल्याने त्यांना त्रास होऊ लागला होता. त्यांचा एचआरसीटी स्कोअर वीस होता, त्यांना खूपच त्रास होऊ लागल्याने शहरातील हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नव्हता. नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातदेखील चौकशी करुन नंबर लावून ठेवला होता. शेवटी उपचारासाठी नांदगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. दोन दिवस तेथे उपचार घेतले. पण तेथे आवश्यक त्या सुविधा मिळत नसल्याने आणि त्याचवेळी डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात बेड उपलब्ध झाल्याचे सांगण्यात आल्याने सुगंधाबाई थोरात यांना नांदगाव येथून पुन्हा या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आणि दोन दिवसांनी ऑक्सिजन गळतीमुळे त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगी आणि नातू असा परिवार आहे.

इन्फेा..

प्राणवायूच ठरला घातक

सातपूर कॉलनीतील गीताबाई रावसाहेब वाकचौरे (वय ५२) यांना सुरुवातीला ताप आला होता. सुरुवातीला खासगी दवाखान्यातून उपचार घेतले. ताप कमी होत नसल्याने कोरोना चाचणी केली असता, चाचणी पॉझिटिव्ह आली शिवाय श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्याने शहरातील रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. पण कुठेही बेड मिळत नव्हता. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात चौकशी करुन नंबर लावून ठेवला होता. वेटिंगनंतर बेड मिळाला. गीताबाई वाकचौरे यांना ऑक्सिजनची आवश्यकता होती आणि त्याच ऑक्सिजनअभावी (ऑक्सिजन गळतीमुळे) त्यांचा डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

इन्फो...

दिल्लीतून नाशकात आले पण...

दिल्ली येथून नाशिकला आलेल्या आशा जयपाल शर्मा (वय ४५) या दिल्लीत धुणीभांडीचे काम करत होत्या. त्यांना पाच मुली असून, मोठी मुलगी सातपूरच्या संत कबीर नगरमध्ये राहते. परिस्थितीअभावी चार मुलींना दिल्लीतील अनाथाश्रमात ठेवले आहे. १० एप्रिल रोजी आशा शर्मा या दिल्लीहून मोठ्या मुलीकडे सातपूरला आल्या होत्या. काही दिवसातच त्यांना कोरोनामुळे श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्याने दवाखान्यात दाखल करणे गरजेचे होते. पण कुठेही बेड मिळत नव्हता. अखेर तिच्या मुलीने डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय गाठले. तेथेही बेड मिळत नव्हता. रात्रभर रुग्णालयाबाहेर पायरीवर बसून राहिल्याने रुग्णालयातील डॉक्टरांनी तात्पुरता ऑक्सिजन लावला. दोन दिवसानंतर बेड मिळाला होता. चार दिवसानंतर तब्बेतीत थोडी सुधारणा होऊ लागली. त्यातच ऑक्सिजन गळतीमुळे अक्षरशः तडफडून मेल्याचे तिच्या मुलीने सांगितले. तिच्या पश्चात चार अल्पवयीन मुली, एक मोठी मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: The family of the deceased in the oxygen leak opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.