निवडणुकीत उमेदवारीवरून वाढणार कौटुंबिक कलह
By admin | Published: October 26, 2016 12:28 AM2016-10-26T00:28:45+5:302016-10-26T00:29:29+5:30
नातीगोती आणि भाऊबंदकीतील वाद उफाळले
नाशिक : जिल्हा परिषद निवडणुकीत गटांच्या आरक्षणांमुळे अनेक इच्छुकांचे हिरमोड झाले आहे. तरीही आपल्या ‘इच्छेला’ हिरमोड घालण्यास इच्छुक काही केल्या तयार होत नसल्याचे चित्र आहे. त्यात ‘भाऊ’बंदकी आणि सगेसोयरिक यामध्ये कलह वाढण्यास सुरुवात झाली आहे. नाशिकमधील गिरणारे गटातून माजी सभापती हिरामण खोसकर यांच्या कन्या विद्यमान सदस्य इंदुमती खोसकर राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात असताना येथूनच खोसकर यांचे जावई पंचायत समिती सदस्य प्रकाश बदादे यांच्या स्नुषा सुनीता संजय बदादे कॉँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे सासरे-जावई यांच्या नातेसंबंधात दुरावा आल्याची चर्चा आहे. त्यातच घोटी जिल्हा परिषद गटातून विद्यमान सदस्य अलका जाधव यांचे पती उदय जाधव राष्ट्रवादीकडून इच्छुक असून, त्यांना येथून पारंपरिक ‘भाऊ’बंदकीची अडचण होण्याची चिन्हे आहे. त्यातल्या त्यात याच गटातून इच्छुक असलेले राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष व विद्यमान सदस्य गोरख बोडके यांनी राष्ट्रवादीकडून आपण नव्हे तर उदय जाधव हेच उमेदवार निश्चित असल्याचे सांगितल्याने उदय जाधव यांना दिलासा मिळाल्याची चर्चा आहे. तिकडे पालखेड गटातून राष्ट्रवादीकडून माजी आमदार दिलीप बनकर यांच्या पत्नी विद्यमान सदस्य मंदाकिनी बनकर इच्छुक असताना येथूनच त्यांचे पुतणे गणेश बनकर यांनी राष्ट्रवादीकडून दावेदारी सांगितली आहे. असाच काहीसा प्रकार सायखेडा गटात आहे. येथून माजी उपाध्यक्ष दिगंबर गिते कॉँग्रेसकडून उमेदवारीसाठी आग्रही असताना येथून त्यांचेच पुतणे गोकूळ गिते यांनी राष्ट्रवादीकडून चाचपणी सुरू केली आहे. मात्र येथून राष्ट्रवादीकडून सुरेश कमानकर यांचे नाव यापूर्वीच चर्चेत आले आहे. तिकडे सर्वाधिक ‘हॉट’ गट म्हणून चर्चेत असलेल्या पठावेदिघर गटातून विद्यमान सदस्य सिंधूताई सोनवणे यांचे पती संजय सोनवणे इच्छुक असताना त्यांचे भाचे म्हणवून घेणारे माजी सभापती शैलेश पवार यांनीही दावेदारी सांगितल्याने येथून मामा-भाच्याच्या संबंधात दुरावा निर्माण होण्याची भीती आहे. (प्रतिनिधी)