खाटांच्या क्षमतेवरच होणार कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:24 AM2021-02-06T04:24:35+5:302021-02-06T04:24:35+5:30
या संदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी गेल्याच आठवड्यात आरोग्य विभागाला याबाबत मार्गदर्शक तत्त्वे ठरविण्याबाबतच्या सूचना ...
या संदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी गेल्याच आठवड्यात आरोग्य विभागाला याबाबत मार्गदर्शक तत्त्वे ठरविण्याबाबतच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र असो वा ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी जितक्या खाटा उपलब्ध असतील तितक्याच महिलांची एकाच वेळी शस्त्रक्रिया करण्याचे ठरविण्यात आले. खाटा कमी आणि महिलांची संख्या अधिक असेल तर आठवड्यातून दोन वेळा अशा शस्त्रक्रिया केल्या जाव्यात किंवा रुग्णालयात अतिरिक्त खाटा उपलब्ध होणार असेल तर तितक्या प्रमाणात शस्त्रक्रिया करण्याचे ठरविण्यात आले आहे. अशा शस्त्रक्रिया करण्यापूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर अगोदर महिलांची नोंदणी करण्यात यावी, नोंदणीच्या आधारे महिलांची संख्या निश्चित होण्यास मदत होईल त्याचबरोबर प्रत्येक आरोग्य केंद्रावर कोणत्या दिवशी शस्त्रक्रिया केल्या जातील, याचे वेळापत्रक ठरविण्यात येणार आहे. त्यासाठी शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर कोण, शस्त्रक्रियेचा वार, तारीख याची माहिती असेल व आरोग्य केंद्रांच्या दर्शनी भागात ते लावण्याचे ठरविण्यात आले आहे.
नाशिक जिल्ह्यासाठी दरवर्षी २४ हजार कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट आहे. विशेषत: आदिवासी भागात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी या नियमावलीचा वापर केला जाणार असून, शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासारखा प्रकार घडणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना तालुका वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.