देवदर्शनासाठी गेलेले कुटुंब अद्यापही बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:41 AM2019-05-20T00:41:42+5:302019-05-20T00:43:04+5:30
देवदर्शनासाठी गेलेल्या पंचवटीतील गौडा कुटुंबीयांचा गेल्या पाच दिवसांपासून संपर्क होत नसल्याने त्यांचे नातेवाइक चिंतेत आहेत़ दरम्यान, पोलिसांनी तपासाचे चके्र फिरविले असून औरंगाबाद मार्गावरील टोलनाके तपासणी केली जात आहे़
पंचवटी : देवदर्शनासाठी गेलेल्या पंचवटीतील गौडा कुटुंबीयांचा गेल्या पाच दिवसांपासून संपर्क होत नसल्याने त्यांचे नातेवाइक चिंतेत आहेत़ दरम्यान, पोलिसांनी तपासाचे चके्र फिरविले असून औरंगाबाद मार्गावरील टोलनाके तपासणी केली जात आहे़ हिरावाडीमधील बनारसीनगर येथील पाच व्यक्तींचे कुटुंब आंध्र प्रदेशात देवदर्शनासाठी निघाले मात्र त्यांचा कुणाशीही संपर्क होऊ शकलेला नाही़
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हिरावाडीमध्ये असलेल्या बनारसीनगर येथील गौडा कुटुंब खासगी इंडिका मोटारीने (एम.एच १५डी.एम २६६४) आंध्र प्रदेश राज्यात देवदर्शनाकरिता सोमवारी (दि.१३) राहत्या घरातून दुपारी पाऊण वाजेच्या सुमारास निघाले; मात्र ते अद्यापपावेतो घरी परतले नसल्याने हरिष गौडा यांचा मित्र अशोक गौडा (३५,रा.बनारसीनगर) यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात हरिष गौडा व त्यांच्या आई नाजुडामा (६०) पत्नी सुधा गौडा (३५), पूजा गौडा (१५), दिया गौडा (११) हे बेपत्ता झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
गौडा कुटुंब देवदर्शनासाठी मोटारीने निघाले; मात्र त्यांचा पुन्हा संपर्क झाला नाही. चार दिवस उलटूनही ते न परतल्याने शेजारी राहणाऱ्या मित्राने पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.
संपूर्ण कुटुंब घरातून निघून गेले; मात्र त्यांचा अद्याप कुठेही पत्ता लागला नसून मित्राने हरिष यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला; मात्र त्यांच्याशी कुठलाही संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे गौडा यांनी पोलिसांकडे धाव घेतली. अचानकपणे बेपत्ता झालेल्या या कुटुंबाचा शोध घेण्याचा प्रयत्न पंचवटी पोलीस करत आहेत; मात्र अद्याप त्यांचा कुठलाही थांगपत्ता लागू शकलेला नाही. तक्रारदार अशोक यांनी त्यांच्या नातेवाइकांकडेही याबाबत चौकशी केली असून, ते कोणाकडेही थांबले नसल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी तक्रार करून संबंधित कुुटुंबाचा शोध घेण्याचे गाºहाणे मांडले आहे. मोटारीचा क्रमांक, मोबाइल क्रमांकावरून पंचवटी पोलीस या कुटुंबाचे ‘लोकेशन’ मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत; मात्र अद्याप पोलिसांच्या प्रयत्नांनाही यश आलेले नाही.
औरंगाबादपर्यंत माग
मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद मार्गे गेलेले गौडा कुटुंबीयांची गाडी औरंगाबाद टोलनाक्यावरून पुढे गेल्याची माहिती हाती लागली आहे़ याशिवाय गौडा यांनी अलिकडेच पंचवटीत बिअरबार व्यवसाय सुरू केला असून, त्याचीदेखील पडताळणी पोलिसांकडून केली जात आहे़