बहारदार सुरांना रसिकांची दाद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2021 01:23 AM2021-12-13T01:23:36+5:302021-12-13T01:23:56+5:30
स्वनिर्मित आनंद कल्याण रागाबरोबरच, गौरी रागातील रूपक तालातील बंदीश आणि मारवा रागातील बहारदार सुरांना रसिकांची मिळालेली मनमुराद दाद प्रख्यात ज्येष्ठ शास्त्रीय गायिका अल्का देव मारुलकर यांची मैफल संस्मरणीय करणारे ठरले. यावेळी स्वानंद बेदरकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत अल्काताईंनी त्यांच्या गायनप्रवासाचे विविध पैलू उलगडले.
नाशिक : स्वनिर्मित आनंद कल्याण रागाबरोबरच, गौरी रागातील रूपक तालातील बंदीश आणि मारवा रागातील बहारदार सुरांना रसिकांची मिळालेली मनमुराद दाद प्रख्यात ज्येष्ठ शास्त्रीय गायिका अल्का देव मारुलकर यांची मैफल संस्मरणीय करणारे ठरले. यावेळी स्वानंद बेदरकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत अल्काताईंनी त्यांच्या गायनप्रवासाचे विविध पैलू उलगडले.
येथील कुसुमाग्रज स्मारकात स्वरानुभूतीची सप्तदशपूर्ती या डॉ. अलका देव मारुलकर यांच्या सुश्राव्य गायन व प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. विशाखा सभागृहात झालेल्या या सोहळ्यात कार्यक्रमाच्या पूर्वार्धात अल्काताईंनी सादर केलेल्या बंदिशींना रसिक प्रेक्षकांनी दाद दिली. त्यांना तबला साथ संजय देशपांडे, संवादिनीवर सुयोग कुंडलकर, तानपुऱ्यावर शिवानी मारूलकर दसककर आणि कल्याणी दसककर तत्त्ववादी यांनी साथसंगत केली. कार्यक्रमात मध्यंतरानंतर बेदरकर यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीच्या माध्यमातून अल्काताईंचे सांगीतिक विचार त्यांनी उलगडून सांगितले. प्रारंभिक शिक्षण वडील पं. राजाभाऊ देव आणि त्यानंतर पं. मधुसूदन कानेटकर यांच्याकडे झाल्याचे सांगून त्यांचा गायनाचा पाच दशकांचा प्रवास त्यांनी विशद केला. यावेळी अल्काताईंनी त्यांनी निर्माण केलेल्या रागदारीचीही माहिती दिली. कार्यक्रमास रसिक प्रेक्षकांची प्रचंड उपस्थिती लाभल्याने विशाखा सभागृह ओसंडून वाहत होते.