विलगीकरण कक्षातून २२ कोरोनामुक्तांंना निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 08:28 PM2021-05-29T20:28:08+5:302021-05-29T23:58:46+5:30
नायगाव :येथील ग्रामविकास समिती व लोकवर्गणीच्या माध्यमातून उभारलेल्या विलगीकरण कक्षातुन एकाच दिवसात बावीस रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना निरोप देण्यात आला. या बावीस जणांमध्ये एका ८७ वर्षांच्या वृद्धाचाही समावेश होता.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरी भागापाठोपाठ ग्रामीण भागात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या मदतीने ग्रामविकास समितीची स्थापना करून गावात कोरोना रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष सुरू केला. सदस्य असलेल्या तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सहकार्य करण्याचे आवाहन केले होते.या आवाहनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत नायगावकरांनी आर्थिक, आवश्यक वस्तू , औषधे आदींसह फळे, अंडी आदींच्या स्वरूपात मदत केली. लोकसहभागातून तयार झालेल्या सुविधांयुक्त विलगिकरण कक्ष उभारून गरीब व गरजू रुग्णांसाठी मोफत औषधोपचार व पोषक आहार व वैद्यकीय सेवा याठिकाणी दिली जात आहे.
या कक्षातील रुग्णांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी विजय घिगे, डॉ. राजेंद्र बैरागी, किरण घिया, समाधान कदम, एकनाथ जारकड, विलास कर्डक, भाऊसाहेब भालेराव, सौरभ बैरागी, गोविंद कदम, आनंद कदम, अरुण शिंदे, बबलू गाडेकर आदींसह सामाजिक कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत.