दीड दिवसाच्या बाप्पांना निरोप !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:18 AM2021-09-12T04:18:32+5:302021-09-12T04:18:32+5:30
पंचवटी : गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या असा जयघोष करीत दीड दिवसाच्या गणरायाला शनिवारी (दि. ११) दुपारी ...
पंचवटी : गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या असा जयघोष करीत दीड दिवसाच्या गणरायाला शनिवारी (दि. ११) दुपारी विधिवतपणे भावपूर्ण निरोप देण्यात आला. शनिवारी दुपारनंतर दीड दिवसाच्या गणरायाचे गोदावरी नदीपात्रात, तर अनेक नागरिकांनी घरच्या घरीच आरती करून विसर्जन केले.
शुक्रवारी लाडक्या गणरायाचे मोठ्या उत्साहमय वातावरणात जल्लोषात स्वागत करण्यात आले होते. गणेशोत्सवानिमित्ताने अनेक भक्तगण दरवर्षी घरोघरी श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करतात. गणेश प्रतिष्ठापना करणारे भाविक कोणी दहा दिवस, तर कोणी दीड दिवसांपर्यंत घरात गणेशाची प्रतिष्ठापना करतात. शनिवारी गणपती प्रतिष्ठापना दीड दिवसाचा कालावधी पूर्ण झाल्याने दुपारी दीड दिवसांचा गणेशोत्सव साजरा करणाऱ्या भाविकांनी गंगाघाटावर, तसेच गोदावरी नदीपात्रात गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करून दीड दिवसाच्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. मनोभावे गणरायाची पूजा करून अनेक नागरिकांनी शाडू मातीच्या मूर्तीचे घरोघरी विसर्जन केले. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पोलीस आणि महापालिका प्रशासनाला बहुतांश नागरिक सहकार्य करीत असल्याचे पाहायला मिळाले, तर घाटावर या दीड दिवसाच्या गणरायाला निरोप देण्यापूर्वी गणेश भक्तांनी विधिवतपणे गणेशाचे पूजन करून महाआरती व मोदकाचा नैवेद्य लाडक्या गणरायाकडे सर्व देशावर पसरलेले कोरोना संकट लवकर दूर व्हावे अशी प्रार्थना करून बाप्पांचे विधिवत नदीपात्रात विसर्जन करून निरोप दिला.