फेरनियोजन राहणार कागदावरच ?
By admin | Published: September 10, 2015 12:09 AM2015-09-10T00:09:08+5:302015-09-10T00:09:30+5:30
पोलीस बंदोबस्त : येणाऱ्या गर्दीवरच असेल बंदोबस्ताची भिस्त; ऐनवेळी धावपळीची शक्यता
नाशिक : पहिल्या पर्वणीला अपेक्षित गर्दी नसतानाही पोलिसांनी बंदोबस्ताचा केलेला अतिरेक, सामान्य नागरिकांसह भाविकांचे झालेले हाल आणि पायपीट. परिणामी माघारी गेल्यानंतर भाविकांनी नाशिकची कुप्रसिद्धीच केली़ मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांनी कानपिचक्या दिल्यानंतर पोलीस आयुक्तांनी बंदोबस्ताचे फेरनियोजन केले़ भाविक व स्थानिकांच्या दृष्टिकोनातून अनेक सहजसुलभ बदल फेरनियोजनात केले असले तरी गर्दीनुसार तो केला जाणार असल्याने ते केवळ कागदावरच राहण्याची शक्यता आहे़
सिंहस्थ बंदोबस्तासाठी आलेल्या रिक्रूटला शहराची नसलेली माहिती, अनुभवी कर्मचाऱ्यांची न मिळालेली साथ, जागोजागी बॅरिकेडिंग यामुळे केवळ भाविकांच्या पायपिटीत भर पडली नाही तर स्थानिक नागरिकांना आपल्या घरातच स्थानबद्ध व्हावे लागले़ संपूर्ण रोड खुला असताना दूधविक्रेत्यांसह अनेक जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्यांना पोलिसांनी अडवून ठेवले़ पर्वणीत भाविकांच्या गर्दीमुळे शहराच्या अर्थकारणात मोठी भर पडेल, ही आशा पोलिसांच्या नियोजनामुळे फोल ठरली़ त्यामुळे पोलिसांना सर्वांच्याच टीकेचे धनी व्हावे लागले़
पोलीस यंत्रणेवर मंत्र्यांसह सर्वांनीच केलेल्या टीकेतून धडा घेऊन शहाणे झालेल्या पोलीस आयुक्तांनी दुसऱ्या पर्वणीसाठी बंदोबस्ताचे फेरनियोजन केले आहे़ त्यामध्ये वाहतुकीचे मार्गनिहाय नियोजन करण्यात आले आहे़ बाह्य वाहततळावरून अंतर्गत वाहनतळापर्यंत येण्यासाठी बससेवा तसेच नाशिककरांची स्थानबद्धतेवर उपाय म्हणून शहरांतर्गत सुरू करण्याचा निर्णय घेतला़ त्यानुसार सुमारे १८० बसेसमधून ही वाहतूक केली जाणार आहे़ अंतर्गत बसस्थानक ते घाटापर्यंतचे अंतर कमी करण्यात आले असून, त्यासाठी प्लॅन अ व प्लॅन ब असे दोन आराखडे तयार करण्यात आले आहेत़ भाविकांच्या संख्येनुसार यातील कोणता प्लॅन सुरू ठेवायचा याबाबत निर्णय घेतला जाणार आहे़ (प्रतिनिधी)