निऱ्हाळे शिवारात ‘गांजाची शेती’
By Admin | Published: October 28, 2015 11:21 PM2015-10-28T23:21:58+5:302015-10-28T23:23:47+5:30
कारवाई : वावी पोलिसांचा छापा; झाडे केली जप्त
सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील अवर्षणग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निऱ्हाळे शिवारात एका शेतकऱ्याने ठिबक सिंचनाद्वारे चक्क गांजाची शेती फुलवली असल्याचा प्रकार उघडकीस आला. वावी पोलिसांनी या गांजाच्या शेतीवर छापा टाकून रात्री उशिरापर्यंत गांजाची झाडे मोजून पंचनामा करण्याची कारवाई सुरू केली होती.
राजस्व अभियानातून घोटेवाडी-निऱ्हाळे हा शिवरस्ता खुला करण्यासाठी सिन्नरचे तहसीलदार मनोजकुमार खैरनार, वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक हेमंत पाटील व अन्य शासकीय अधिकारी व कर्मचारी गेले होते. शिवरस्ता खुला झाल्यानंतर एका खबऱ्याने निऱ्हाळे शिवारातच गांजाची शेती असल्याची माहिती सहाय्यक निरीक्षक हेमंत पाटील यांना दिली. पाटील यांच्यासह उपनिरीक्षक रामेश्वरी पांढरे, हवालदार रामदास धुमाळ, हनुमंत कांबळे, एस.व्ही. शिंदे यांनी जवळच असणाऱ्या शेतात जावून पाहणी केली. यावेळी पोलिसांना शेतात बहरलेली गांजाची मोठी झाडे दिसून आली. पोलिसांनी तपासणी केल्यानंतर सदर झाडे गांजाचीच असल्याची खात्री पटली.
निऱ्हाळे शिवारातील एकनाथ भीमाजी पठारे याने त्याच्या शेतीचा गट क्रमांक ३५७ मध्ये गांजाची शेती केल्याचे पोलिसांना निदर्शनास आले. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत सदर गांजाची झाडे तोडून जप्त करण्याचे काम सुरु केले होते.
रात्री आठ वाजेपर्यंत पोलिसांनी गांजाची सुमारे ७१ झाडे तोडून जप्त केली होती. सिन्नरचे पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे, निऱ्हाळेचे पोलीस पाटील शिवाजी शिंदे यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्याचे काम सुरु होते.
पोलिसांनी संशयित आरोपी एकनाथ पठारे यास ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर गुंगीकारक औषधे, मनोविकार पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती सहायक निरीक्षक हेमंत पाटील यांनी दिली. (वार्ताहर)