शेतकऱ्याला व्यापाऱ्याकडून मारहाण; येवल्यात रास्ता रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:11 AM2021-06-22T04:11:28+5:302021-06-22T04:11:28+5:30
कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलाव झाल्यानंतर आपल्या मालाचे पैसे घेण्यासाठी गेलेला अक्षय भाऊसाहेब गुडघे (३०, रा. ममदापूर ता. ...
कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलाव झाल्यानंतर आपल्या मालाचे पैसे घेण्यासाठी गेलेला अक्षय भाऊसाहेब गुडघे (३०, रा. ममदापूर ता. येवला) या शेतकऱ्यास व्यापाऱ्याने मारहाण केली. शेतकऱ्याकडील कांद्याची पावती फाडून टाकली. यानंतर बसस्थानक जवळील चौफुलीवर ट्रॅक्टर थांबवून सदर शेतकऱ्याला पुन्हा मारहाण करण्यात आली.
सदर घटनेची माहिती मिळताच इतर शेतकरीही संतप्त झाले. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांनी रस्त्यावर ट्रॅक्टर आडवे लावून अचानकपणे रास्ता रोको सुरू केला. यामुळे नगर - मनमाड महामार्गावर सुमारे एक तास वाहतूक कोंडी झाली होती. जोपर्यंत व्यापारी शेतकऱ्याची माफी मागत नाही तोपर्यंत रास्ता रोको सुरू राहील, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी शेतकऱ्यांची समजूत घालत जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकरी ऐकत नसल्याने शेवटी पोलिसांनी बळाचा वापर करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.
शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना व प्रहार संघटना शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे शिवसेना तालुकाप्रमुख रतन बोरणारे, प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन यांनी यावेळी स्पष्ट केले.
फोटो- २१ येवला रास्ता रोको