शेतकरी विकास पॅनलची बाजी

By admin | Published: August 29, 2016 01:47 AM2016-08-29T01:47:44+5:302016-08-29T01:51:55+5:30

वावी सोसायटी : विजय काटे गटाचा दणदणीत विजय; राजेभोसले गटाचा दारुण पराभव

Farmer Development Panel | शेतकरी विकास पॅनलची बाजी

शेतकरी विकास पॅनलची बाजी

Next

वावी : सिन्नर तालुक्यातील संवदेनशील समजल्या जाणाऱ्या वावी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत उपसरपंच व विकास संस्थेचे विद्यमान अध्यक्ष विजय काटे यांच्या शेतकरी विकास पॅनलने सर्वच्या सर्व जागा जिंकून सत्ता राखण्यात यश मिळविले. विरोधी परिवर्तन पॅनलचे नेते सिन्नर बाजार समितीचे माजी सभापती विठ्ठल राजेभोसले गटाचा दारुण पराभव झाला. राजेभोेसले यांच्या परिवर्तन पॅनलला एकही जागा मिळविता आली नाही.
स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ग्रामसभेत विकास संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काटे व राजेभोसले गटात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर दोन्ही गटाने एकमेकांविरोधात अपहरणाच्या तक्रारी दिल्याने दोन्ही गटाच्या २६ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे निवडणुकीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वावी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक रणजित आंधळे यांनी शेवटचे दोन दिवस चोख बंदोबस्त ठेवून निवडणूकप्रक्रिया शांततेत पार पाडली.
रविवारी दुपारी ४ वाजेपर्यंत ५२३ पैकी ४८७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर ताबडतोब मतमोजणी करण्यात आली. सर्वसाधारण गटात शेतकरी विकास पॅनलचे विजय भीमराव काटे (२६६), संतोष किसन कर्पे (२५४), विजयकुमार भगीरथ जाजू (२४७), ज्ञानदेव गंगाधर काटे (२३७), संतोष चंद्रभान काटे (२३४), दिनकर रघुनाथ वेलजाळी (२२९), आनंदा तुकाराम शेलार (२२५) व सुधाकर कारभारी उगले (२१८) विजयी झाले, तर परिवर्तन पॅनलचे नंदकिशोर मालपाणी, चांगदेव पठाडे, विठ्ठल राजेभोसले, राजेंद्र संधान, इलाहीबक्ष शेख, अशोक ताजणे, दशरथ वेलजाळी, नामदेव वेलजाळी यांचा पराभव झाला.
महिला राखीव गटात शेतकरी विकास पॅनलच्या कल्पलता कारभारी वेलजाळी व मंदा भागवत वैराळ यांनी परिवर्तन पॅनलच्या यमुनाबाई पांडुरंग नवले व ताराबाई कचरू शिंदे यांना पराभूत केले. भटक्या विमुक्त गटात सोमनाथ केदू कांदळकर यांनी जनार्दन भानुदास रहाटळ यांचा पराभव केला. इतर मागास प्रवर्गात संजय रामनाथ वेलजाळी यांनी ज्ञानेश्वर पंढरीनाथ गलांडे यांचा, तर अनुसूचित जाती जमाती गटात नवनाथ तुकाराम घेगडमल यांनी रामदास मल्हारी घेगडमल यांचा पराभव केला.
निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला. यावेळी सभापती संगीता काटे, माजी सरपंच चंद्रकांत वेलजाळी, रामनाथ कर्पे, सरपंच मंगल वेलजाळी, प्रशांत कर्पे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.(वार्ताहर)

Web Title: Farmer Development Panel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.