तीन एकरावरील कोथिंबिरीतून शेतकऱ्याला मिळाले १७ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 01:57 AM2019-07-20T01:57:28+5:302019-07-20T01:57:47+5:30
कोथिंबिरीसारख्या अवघ्या दीड ते दोन महिन्यांच्या पिकातून निफाड तालुक्यातील कोकणगाव येथील शेतकºयाला तीन एकरात तब्बल १७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
नाशिक : कोथिंबिरीसारख्या अवघ्या दीड ते दोन महिन्यांच्या पिकातून निफाड तालुक्यातील कोकणगाव येथील शेतकºयाला तीन एकरात तब्बल १७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
निफाड तालुक्यातील कोकणगाव येथे सुरेश जाधव यांची शेतजमीन आहे. पालखेड उजवा कालव्याच्या लगत असलेली ही जमीन रज्जाक सय्यद हे निम्म्या वाट्याने कसतात. एप्रिल आणि जून महिन्यात कालव्याला रोटेशन सोडण्यात आले होते. यामुळे विहिरीला पाणी आले. मे महिन्यात सय्यद यांनी तीन एकर क्षेत्रावर हायब्रीड कोथिंबिरीची लागवड केली होती. त्यांना ७२ किलो बियाणे लागले. त्यांना ४० हजार रुपये लागवडीचा खर्च आला. लागवडीनंतर साधारणत: सव्वा महिन्यात कोथिंबीर परिपक्व झाली. ही कोथिंबीर मार्केटला न नेता त्यांनी जागेवरच विक्री करण्याचा निर्णय घेतला. सिन्नर येथील सोमनाथ सांगळे आणि किसन आव्हाड या व्यापाऱ्यांनी कोथिंबीर पिकाची पाहणी करून तीन एकरातील तोड्याचा सौदा १० लाखांना पक्का केला. विशेष म्हणजे कोथिंबीर तोडून घेण्याची जबाबदारीही व्यापाºयांनीच घेतल्याने सय्यद यांचा तो खर्चही वाचला. पहिला तोडा पूर्ण झाल्यानंतर खुरटलेल्या कोथिंबिरीला सय्यद यांनी पुन्हा पाणी भरले आणि खत टाकले. अवघ्या १५ दिवसात दुसरा टप्प्यातील माल काढणीला आला. त्यांनी पुन्हा त्याच व्यापाºयांशी सौदा केला. त्यानंतर तिसºया टप्प्यातील मालही संबंधित व्यापाºयांनी खरेदी केला. एकूण तीन टप्प्यात झालेल्या पिकातून सय्यद यांनी १७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. खर्चवजा जाता जमीनमालक आणि कसणारे या दोघांनाही चांगले उत्पन्न मिळाले.