बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 04:28 PM2020-08-08T16:28:49+5:302020-08-08T16:30:59+5:30
देवळा : येथील शासकीय विश्रामगृहाच्या आवारात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गुंजाळनगर येथील शेतमजूर अशोक गुंजाळ जखमी झाले. बिबट्या आता नागरी वस्तीत येऊ लागल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
देवळा : येथील शासकीय विश्रामगृहाच्या आवारात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गुंजाळनगर येथील शेतमजूर अशोक गुंजाळ जखमी झाले. बिबट्या आता नागरी वस्तीत येऊ लागल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
विंचूर-प्रकाशा महामार्गावर गुंजाळनगरपासून एक कि.मी. अंतरावर असलेल्या शासकीय विश्रामगृहाच्या आवारात ही घटना घडली. परिसरात मागील तीन चार दिवसांपासून बिबट्या व त्याचे तीन बछडे संचार करत असल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा होती. बिबट्याने कुत्र्यांवर हल्ले केल्याची घटनादेखील घडली होती. शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शेतमजूर अशोक केदा गुंजाळ कामावरून घरी येत असताना शासकीय विश्रामगृहाजवळ आले असता द्राक्षबागेत दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली. गुंजाळ यांनी आरडाओरडा केल्यामुळे बिबट्या पळून गेला; परंतु गुंजाळ या झटापटीत जखमी झाले. त्यांच्यावर देवळा ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.
गुंजाळनगरच्या ग्रामस्थांनी देवळा वनविभागाला घटनेची माहिती दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. बी. पाटील व वन कमचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. देवळा वनक्षेत्र अंतर्गत उमराणा, देवळा, व खर्डा असे तीन वनपरीमंडल आहेत. देवळा-चांदवड सीमेवर असलेल्या सह्याद्री पर्वतरांगात घनदाट जंगल असल्याने हिंस्र प्राणी मोठ्या संख्येने आहेत. या जंगलालगत असलेल्या भिलवाड, कापशी, भावडे, वडाळे, कनकापूर आदी गावांच्या परिसरात बिबटया, लांडगे, रानडुक्कर आदी श्वापदांचा संचार असून, पाळीव प्राण्यांवर तसेच शेतकºयांवर त्यांनी हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत
गावातील मजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, शेतात काम करण्यास शेतमजूर येत नाही. वनविभागाने तत्काळ पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा.
- दीपक जाधव, ग्रामस्थ, गुंजाळनगर