शेतक-याने पित्याच्या स्मरणार्थ सुरू केली जलसेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 04:52 PM2019-05-18T16:52:12+5:302019-05-18T16:53:18+5:30
सटवाईवाडीला पाणीटंचाई : टॅँकरचा प्रस्ताव शासनाच्या लालफितीत
देवळा : देवळा तालुक्यातील सटवाईवाडी येथे पिण्याच्या पाण्याची तिव्र टंचाई निर्माण झाल्यानंतर पंकज अहेर ह्या शेतक-याने आपल्या पित्याच्या स्मरणार्थ स्वखर्चाने टँकरद्वारे गावाला पाणीपुरवठा सुरू करून जनतेला दिलासा दिला आहे. दरम्यान, सटवाईवाडी ग्रामपंचायतीने शासनाकडे टॅँकर मागणीचा पाठविलेला प्रस्ताव लालफीतीतच अडकलेला आहे.
सटवाईवाडी येथे नऊ गाव पाणीपुरवठा योजनेतून गावाला पाणीपुरवठा केला जातो. लोहोणर येथे गिरणा नदीपात्रातील उद्भव विहीर, व विंधन विहीरीतून सटवाईवाडी येथील जलकुंभात पाणी टाकण्यात येते. त्यानंतर ते वितरीत केले जाते. गिरणा नदीच्या पाण्यावर हि योजना अवलंबून आहे. गिरणानदी कोरडी पडल्यामुळे पाणीपुरवठा योजना बंद पडली आहे. यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. सटवाईवाडी गावात त्वरीत टँकर सुरू करून पाणीटंचाई दूर करावी अशी मागणी करण्यात आली होती. परंतु अद्याप टँकर मिळाला नाही. ग्रामस्थांचे होणारे हाल बघून येथील शेतकरी पंकज अहेर यांनी स्वखर्चाने गावात टँकर सुरू करून गावातील तृषार्त जनतेला दिलासा दिला आहे. यावेळी उपसरपंच अश्विनी अहेर, संभाजी अहेर, प्रा. गोरख निकम, प्रविण मेधने,विलास भामरे, चंद्रकांत अहेर, पुंडलिक अहेर, विजय अहेर, भावडू अहेर, श्रीराम अहेर, रामदास अहेर,रविंद्र अहेर,हेमंत अहेर, गणेश अहेर आदी उपस्थित होते.
टँकर सुरू होत नाही तोपर्यंत पाणीपुरवठा
शासनाकडे टँकरची मागणी करूनही अद्याप टँकर मिळाला नाही. गावात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ भाडयाचा टँकर घेऊन दिवसभर गावात तसेच वाडी, वस्त्यावर घरोघरी जाऊन पाणी वाटप सुरू केले आहे. दिवसभरात टँकरच्या चार ते पाच खेपा होतात. शासकीय टँकर सुरू होत नाही तोपर्यंत स्वखर्चाने गावाला टँकरने पाणीपुरवठा करणार आहे.
- पंकज अहेर , शेतकरी, सटवाईवाडी