कर्जाला कंटाळून अवनखेडच्या शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 03:43 PM2019-06-19T15:43:44+5:302019-06-19T15:44:13+5:30
स्वत:च्याच शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास
दिंडोरी : तालुक्यातील अवनखेड येथील शेतकरी रामनाथ पोपट जाधव-वसाळ (वय ५५) यांनी बुधवारी (दि.१९) सकाळी पहाटे ५ वाजेच्या सुमारास स्वत:च्याच शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. कर्जाला कंटाळून जाधव यांनी आत्महत्या केल्याचे त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीतून स्पष्ट झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, रामनाथ जाधव हे अवनखेड येथील आपल्या मालकीच्या गट नं.१३८ या शेतात वास्तव्यास असून अडीच ते तीन एकर क्षेत्र असणा-या शेतात आपला शेतीव्यवसाय करत होते. परंतु सततची नापिकी, दुष्काळ, शेतमालाला असणारा कवडीमोल भाव, बँकांचा,सहकारी संस्थांचा कर्जाचा डोंगर, बियाणे,खते,औषधे यांच्या गगनाला भिडलेल्या किंमती,द्राक्षांचे घसरलेले दर,शेतीच्या भरवशावर असणारे मुला-मुलींचे विवाह,आजारपण,सहकारी संस्थांकडून होणारा कर्जाचा तगादा या सर्व गोष्टींची सांगड घालताना आपल्या नाकीनव आल्याचे सांगत मी आपली जीवनयात्रा संपवत असल्याचे जाधव यांनी चिठ्ठीत लिहून ठेवले होते. जाधव यांचेवर अंदाजे १० लाख रूपये कर्ज असल्याने ते नेहमीच आर्थिक विवंचनेत असायचे. त्यातच मंगळवारी त्यांना बँकेच्या वसूली विभागाची नोटीस देखिल मिळाली होती. उत्तरीय तपासणीनंतर ग्रामीण रु ग्णालय,दिंडोरी येथे शवविच्छेदन करून पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.अधिक तपास दिंडोरी पोलिस स्टेशनचे प्रभारी उपनिरीक्षक प्रविण पाडवी यांच्या मार्गदर्शनखाली पोलिस हवालदार तुळशीराम जाधव,योगेश भोये हे करत आहेत.